द घोस्ट रायटर : राजकीय थ्रिलर
मला नेहमीच
मोठ्या दिग्दर्शकांच्या मोठ्या सिनेमांपेक्षा छोटे सिनेमे जास्त आवडतात. उदा.
कुरोसावाचा हाय अँड लो, हिचकॉकचा रोप,
स्पीलबर्गचा वॉर ऑफ द वर्ल्डस. हे सिनेमे
त्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणाऱ्या सिनेमांसारखे नाहीत तरी त्यांचं महत्व
कमी होत नाही कारण त्यांनी त्या विषयाकडे एका खास दृष्टीकोणातून पाहिलेलं असतं.
रोमन पोलंस्कीचे सिनेमेसुद्धा जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे आहेत हे आपल्याला
माहितच आहे. हा सिनेमा जरी त्याच्या आधीच्या सिनेमांसारखा नसला तरी आपला छोटेखानी
प्रभाव सोडणारा आहे.
अॅडम लँग (पियर्स
ब्रॉस्नन) हे पूर्वाश्रमीचे ब्रिटिश पंतप्रधान आपल्या आयुष्यावर आधारित मेमॉयर
लिहायचं ठरवतात. त्यांचा पहिला घोस्ट रायटर माईक मॅकआरा समुद्र किनारी मेलेला
आढळतो. जे सिनेमाच्या सुरुवातीलाच दाखवलं जातं. त्याच्या ऐवजी एका नवीन घोस्ट
रायटरला (इवान मॅकग्रेगर) हे काम दिलं जातं. काम करत असताना त्याला आधीच्या
लेखकाने लँग आणि लँगच्या राजकीय कारकिर्दीबद्दलचे काही रहस्य शोधलेले असतात ते हाती
लागतात. तो त्यांचा माग काढायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याचा जीव जाण्याचा धोका
निर्माण होतो. तरी तो चिकाटीने पुस्तक लिहून संपवण्याचा प्रयत्न करतो. काही
अनपेक्षित घटनांमुळे त्याला पुस्तक पूर्ण करता येत नाही पण जे रहस्य त्यात दडलेलं
आहे ते सापडल्यावर त्याला धक्का बसतो तसाच आपल्याला सुद्धा.
थ्रिलर सिनेमा
गतिमान असावा लागतो. हा सिनेमा थ्रिलर जरूर आहे पण यातलं थ्रिल हे त्याच्या आशयाशी
निगडीत आहे. रूढार्थाने सिनेमाची गती सावकाश आहे. कथानक आपल्या गतीने पुढे सरकते
पण त्यातील संदेह आणि रहस्य एकाच वेळी दाखवायचं असल्यामुळे पोलंस्की कथानक
सावकाशीने उलगडत नेतो. पूर्णवेळ सिनेमा संदेह तयार करतो अन् शेवट रहस्योट्घाटनात
करतो. त्यामुळे त्यात आशयातून थ्रिल तयार होते. अॅक्शनला यात फारसा वाव नाही कारण
यात नायक जरी तो लेखक असला तरी अन् आपण त्याच्या दृष्टीकोणातून सिनेमा बघत असलो तरी
कथानक वास्तव पद्धतीने सांगायचं असल्यामुळे अॅक्शनपेक्षा पात्रांच्या वागण्याला व
त्या पाठीमागच्या कारणांना जास्त महत्व येतं.
सिनेमा रॉबर्ट
हॅरिसच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. आपल्या इथे अश्या प्रकारच्या
कादंबऱ्या लिहिल्या जात नाहीत अन त्यावर सिनेमा बनवला जात नाहीत ही बाब सिनेमा
बघताना सारखी मनात येत होती.



Comments