शटर : (अ) नैतिक थ्रिलर

दुर्जन माणसं नेहमी दुर्जनच असतात पण सज्जन माणसं कधी कधी दुर्जन बनतात तेव्हा त्याला काही कारणं असतात का? ती नैतिकतेच्या वाटेने जाणारी वाट वाकडी करून अनैतिक, सामाजिक संकेतांच्या विरोधात जातात तेव्हा त्यात त्यांना त्यातलं थ्रिल अनुभवायचं असतं का की समाजमान्य नैतिक जगणे एका विशिष्ट काळानंतर कंटाळवाणे होत असते म्हणून ती अनैतिक गोष्टींच्या आहारी जातात? जेव्हा असा नायक आपल्या सुखी एकसुरी सुखवस्तू आयुष्यातून एकदम एखाद्या अनैतिक समजल्या जाणाऱ्या अनुभवला भिडतो तेव्हा त्यातनं बाहेर आल्यावर त्याच्यात बदल होतो का की तो अनुभव परत परत त्याला घ्यावासा वाटतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शटर सिनेमात नायक जितेंद्रला असे प्रश्न पडतात तेव्हा त्याच्यात निश्चित असा बदल झालेला असतो.

जितेंद्र उर्फ जित्याभाऊ (सचिन खेडेकर) हा शिपवर काम करणारा नोकरदार इसम. तो काही दिवसांसाठी घरी परत आलाय. त्याचं घर बऱ्यापैकी मोठं आहे. निवृत्त झाल्यावर पेन्शनची सोय व्हावी म्हणून कम्पाउंडला लागून दुकानाचे तीन गाळे बांधून ते भाड्याने दिले आहेत. त्यातल्या एका गाळ्यावर त्याने दावा ठोकला आहे. त्याच्या मेहुण्याने तीन वर्ष तो वापरला पण एकदाही भाडं न देता. घरात तो करड्या शिस्तीचा आहे. मुलीने कोणत्या कॉलेजात शिकावे, कोठल्या मुलांसोबत मैत्री करावी, मोबाईल फोन वापरावा का नाही अशा खाजगी गोष्टीत सुद्धा तो लक्ष घालतो. त्याला घरी असताना दररोज रात्री दारू प्यायला लागते. 

त्यासाठी तो त्याच्या दोन नंबरच्या मुलीला शाळेत नेणाऱ्या ऑटोवाल्या एक्याला (अमेय वाघ) धरून रात्रीच्या दारूची सोय करत असतो. त्या दिवशी सुद्धा तो त्याला दारू आणायला सांगतो. तो व त्याचे इतर मित्र त्या रिकाम्या गाळ्यात शटर बंद करून पार्टी करायला बसतात. एक्या त्याचं दिवसभराचं काम करून येताना दारूची एक बाटली घेऊन येतो. दारू संपते तरी जित्याभाऊला अजून प्यायची असते म्हणून तो व एक्या एके ठिकाणी ती आणायला जातात. दारूच्या दुकानाबाहेरच्या बस स्टॉपवर एक सोनाली (सोनाली कुलकर्णी) नावाची स्त्री थांबलेली असते. ती वेश्या असते. जित्याभाऊ एक्याला ती येते का म्हणून विचार म्हणतो. ती येते. कुठेही जागा मिळत नाही म्हणून ते तिला त्या शटरमध्ये आणतात...


सिनेमाची सुरुवात काही सुटे प्रसंग दाखवून होते. ज्यात वरील उल्लेखलेले जित्याभाऊ आणि एक्या असतात. प्रेक्षकांना यांचीच कथा आहे असं वाटायला लागतं तशी ती त्यांचीच कथा असली तरी त्यांना केंद्रस्थानी ठेवणारी आहे इतकच. हळूहळू एका नंतर एक प्रसंगांनी कथानकात जीव भरायला लागतो तेव्हा सुरुवातीला त्या तशा का दाखवण्यात आलंय याचा उलगडा होतो. एक्याला सकाळच्या नेहमीच्या फेरीत फिल्म स्टुडिओमधनं एक भाडं मिळतं. तो एक दिग्दर्शक असतो. ऑटोतून उतरताना तो त्याची स्क्रिप्ट असणारी बॅग विसरतो. एक्याला ते उशिरा लक्षात येतं पण तो पर्यंत बऱ्याच अनावश्यक घटना घडलेल्या असतात. पटकथेत एका घटनेच्या आजूबाजूला काय घडत असतं याचा चांगला विचार केलेला आहे त्यामुळे वरील प्रसंग उप-कथानकासारखा असला तरी तो विषयांतर करत नाही. प्रेक्षक उलट त्याद्वारे विचार करायला लागतात की पुढे काय होईल.

सिनेमा प्रदर्शित होण्याआधी याची पटकथा हेच एक पात्र आहे असा बोलबाला माध्यमातनं झाला होता. नेहमीच्या मराठी सिनेमात असते त्यापेक्षा वेगळा असा कथानकाचा बाज आहे पण पटकथा हेच पात्र आहे ही थोडी अतिशयोक्ती म्हणावी अशी आहे. पटकथेत अनावश्यक गोष्टींचा भरणा आहे तसेच त्याच्यात एकजिनसीपणा नाही. ती म्हणावी तशी बंदिस्त नाही तर सुटी सुटी आहे. मध्यंतरापूर्वी जेव्हा जित्याभाऊ आणि सोनाली शटरच्या आत असतात तेव्हा जित्याभाऊच्या घरात काय चाललेलं असतं ते दाखवलं जात नाही. पटकथा ही महत्वाची बाजू विसरून जाते. त्यामुळे पटकथेचा फोकस फक्त जित्याभाऊ, एक्या आणि सोनाली यांच्यावर केंद्रित होतो.

तरीही सचिन खेडेकरचा उत्तम अभिनय आणि त्याला इतर सर्वांची साथ ही याची जमेची बाजू. सचिन खेडेकरांना शटरमध्ये बंद झाल्यावर खूप कमी संवाद आहेत पण त्यांच्या देहबोलीतून आणि मुद्राभिनयातून ते जित्याभाऊची घालमेल आणि त्याची तगमग मस्त उभी करतात. आलेल्या अनुभवतनं त्याच्यात होणारा बदल सुस्पष्टपणे प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो.

नैतिक जगणं आणि अनैतिक अनुभवणं यातला संघर्ष एका मध्यममार्गी माणसाच्या आयुष्याच्या एका घटनेवरनं कसा त्याच्यात बदल घडवून आणू शकतो हे थ्रिलरच्या अंगानं जाण्याचा मराठी सिनेमात न अनुभवायला मिळणारा अनुभव घ्यायला सिनेमागृहाची वाट वाकडी करायला हरकत नाही.

रेटिंग ३.५/५

पूर्वप्रसिद्धी : दै. मराठवाड़ा नेता ०५/०७/२०१५

Comments