जय गंगाजल : ये रे माझ्या मागल्या...
खूप वर्षांपूर्वी
दूरदर्शनवर डिस्नीची अलादिन नावाची अॅनिमेतेड सिरीज यायची. अलादिन व त्याचे मित्र राजकुमारी
जॅस्मीन, जीनी, इयागो, अबू यांच्यावर येणारी संकटे असं त्याचं ढोबळ स्वरूप असायचं.
नावाप्रमाणे अलादिन हा नायक असल्यामुळे दर एपिसोडमध्ये येणारी संकटे तो लीलया
परतवून लावणार हे ठरलेलं. तरीही त्याचे मित्र सुद्धा त्याच्या इतकेच महत्वाचे
असल्यामुळे त्यांच्यावर पण काहीतरी संकट येणं क्रमप्राप्त असायचं. संकट आल्यावर
त्या एपिसोड पुरतं ते नायक असायचे पण शेवटी अलादिन त्याच्या धाडसी स्वभावामुळे
त्यांना वाचवायचा. त्याचं नायकत्व यामुळे अबाधित राहायचं. तो नायक असल्यामुळे काही
काही एपिसोड्समध्ये इतर त्याच्यापेक्षा वरचढ वाटणारे असले तरी शेवटी शिक्कामोर्तब
तोच करायचा. जय गंगाजलमधील बी. एन. सिंग ही व्यक्तिरेखा बघितल्यावर वरील पात्रांची
आठवण झाली.
आभा माथुर
(प्रियांका चोप्रा) मध्यप्रदेशातल्या बांकीपूर जिल्ह्याची एसपी म्हणून कारभार
सांभाळायला येते. तिथले विधायक बबलू पाण्डे (मानव कौल), त्यांचा भाऊ डब्लू पाण्डे (निनाद
कामत) व त्याचे साथीदार मुन्ना मर्दानी (मुरली शर्मा) यांचाच तिथे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष
राज चालू असतो. त्याला तिथल्या पोलिसांची साथ असते खासकरून भोलानाथ उर्फ बी. एन.
सिंगची (प्रकाश झा). आभा माथुरला तिथे पाठवणारे मंत्री चौधरी (किरण करमरकर) यांचा
हिशोब असतो हिला आपण शिक्षणासाठी वगैरे आधार दिला तेव्हा पोरगी आपल्या कह्यात
राहील. आभा एका प्रसंगात बबलू पाण्डेच्या पंटरला झोडपून काढून आपला अवतार दाखवायला
सुरुवात करते तेव्हा सर्वांनी पुढे काय घडेल याची चुणूक दिसायला लागते.
पटकथाकार-दिग्दर्शक
प्रकाश झा हे चित्रपट क्षेत्रातलं मोठं नाव. त्यांचे विषय, निव्वळ व्यावसायिक
यशाच्या मागे न धावता आपल्याला पटतील, रुचतील असे विषय ते हाताळतात, त्यात
राजकारण, सामाजिक विषयांना केंद्रस्थानी ठेवून तद्दन शहरी नायक-नायिका न दाखवता
छोट्या शहरातील खासकरून बिहारमधील पार्श्वभूमी वापरतात वगैरे बाबींचा उहापोह
नेहमीच ऐकायला मिळतो. तरीही त्यांचे सर्व सिनेमे बघितल्यावर ते खरंच मांडत
असलेल्या विषयाला न्याय देतात का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे “मृत्युदंड” च्या
आधी व नंतर आलेले सिनेमे असा ढोबळ फरक करता येतो.
“दामुल” व “हिप हिप हुर्रे” हे
बिहारच्या पार्श्वभूमीवर असणारे सिनेमे असले तरी व्यावसायिक नव्हते. त्यांच्या
कथांचा आकार छोटा होता तसेच नट मंडळी नावाजलेली नव्हती. “मृत्युदंड” मधून त्यांनी
कायम व्यावसायिक यशस्वितेची खात्री देणारे नट निवडलेले दिसतात व त्यांच्या
प्रतिमांना धक्का लागणार नाही अशा कथांची रचना केल्याचं दिसून येतं. त्यामुळे तयार
झालेले सिनेमे एका ना धड अशा स्वरुपात राहिलेत असं वाटतं. अपवाद गंगाजल.
जय गंगाजलमध्ये झा
त्याच जुन्या गोष्टींला परत एकदा आजच्या काळात पेश करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे
नावात साम्य असला तरी हा सीक्वेल ठरत नाही. कथानकाचा आवाका गंगाजलसारखाच. असंख्य
बाबींची सामायिकता यात दिसून येते. त्यामुळे मध्यंतरापर्यंत खिळवून ठेवणारा हा
सिनेमा नंतर एकदम घसरायला लागतो. डब्लू पाण्डे या व्यक्तिरेखेचं वागणं व त्याला
मिळणारी शिक्षा हा सिनेमाचा हायलाईट आहे. कथानकातलं त्याचं स्थान व दिग्दर्शकीय
कौशल्याचा वापर करून ते त्याला प्रचंड प्रभावित करून सोडतात. इथे प्रेक्षकांना वाटतं
आता काहीतरी वेगळं घडणार पण हाय रे ये रे माझ्या मागल्यासारखं दिग्दर्शक ते सुख
हिरावून घेतो अन् मळलेली वाट चोखाळायला लागतो.
वर उल्लेख
केल्याप्रमाणे बी. एन. सिंग ही व्यक्तिरेखा इथे कोण आहे हा प्रश्न उपस्थित होतो.
संपूर्ण सिनेमात सर्वात जास्त वेळा दिसणारी व घडणाऱ्या घटनांत महत्वाची असणारी ही
व्यक्तिरेखा नेमकं मुख्य नायक आहे की नायिका इतपत तुल्यबळ झाली आहे. कथेला नायक
असणं गरजेचं असतं त्यामुळे शेवटी त्याने खलनायकाला मारणे अपेक्षित. इथे नायकाने
नायकत्व सिद्ध केल्यावर सुद्धा त्याचा प्रभाव कमी राहतो.
एका अर्थाने नायक बी. एन.
सिंग आहे असं म्हणायला जागा पटकथाकार-दिग्दर्शकाने ठेवली आहे. व्यक्तिरेखा सुद्धा
त्रिमिती असणारी अगदी नायिका आभा माथूर एकमिती आकाराची त्यामुळे चटकन उठून दिसणारी.
तसेच प्रकाश झानी त्यांच्या पहिल्याच कामात अप्रतिम अभिनय केला आहे. व्यक्तिरेखेला
साजेसं वय असलं तरी ते समजूतदारपणे व्यक्तिरेखेत रंग भरतात.
क्वांटिको मालिकेमुळे भलतीच फॉर्मात असणारी प्रियांका चोप्रा मुख्य नायिका
असून सुद्धा प्रभाव पाडू शकत नाही ते तिच्या अभिनयाच्या मर्यादांमुळे. अर्थात
त्याला व्यक्तिरेखेचा एकमितीपणा पण कारणीभूत आहे. तिचा अभिनय बाजीराव-मस्तानीमधील काशीबाई
इतपतच राहतो. इतर मंडळीत किरण करमरकर, मानव कौल, मुरली शर्मा, राहुल भट
सालाबादप्रमाणे उत्तम साथ देतात. पार्श्वभूमीला वाजणारी गाणी लक्षात राहत नाहीत.
गेल्या काही वर्षात समकालीन विषय केंद्रस्थानी ठेवणारे प्रकाश झा आशयात खोली
कधी दाखवणार याची वाट मात्र बघावी लागणार.
रेटिंग २.५/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह ०६/०३/२०१६





Comments