रॉकी हँडसम : स्टायलीश नक्कल
रिमेक करताना नेमकं कुठल्या गोष्टी घ्यायचा किंवा कुठल्या गोष्टी घ्यायच्या
नाहीत याचं भान निर्मात्यांना असणं नितांत गरजेचं असतं. त्याची बरीच कारणं आहेत.
पहिलं कारण सामाजिक वास्तवात होणारा बदल म्हणजे एखाद्या युरोपिअन देशाच्या पार्श्वभूमीवर
घडणारी कथा तिथल्या सांस्कृतिक, सामाजिक वास्तवाला आधार घेऊन बनवलेली असते.
कथानकात घडणारे प्रसंग काही एक प्रमाणात तिथल्या वास्तवाचं चित्रपटीय रुपांतर असू
शकतील भलेही सिनेमा एखादा क्राइम थ्रिलर असला तरी. जेव्हा तेच कथानक भारतासारख्या
सर्वार्थाने वेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीवर दाखवायचा असेल तर त्याला
इथल्या वास्तवाचा आधार असणं अपेक्षित आहे किंवा निदान ते विश्वसनीय वाटावं. पण
निशिकांत कामत दिग्दर्शित “रॉकी हँडसम” या “द मॅन फ्रॉम नोव्हेअर” या कोरिअन
सिनेमाच्या रिमेकबद्दल ठोसपणे सांगता येत नाही.
कबीर अहलावत/रॉकी हँडसम (जॉन एब्राहम) हा गोव्यात एक पॉनशॉप चालवत असतो. तो
एकटाच राहत असतो. त्याच्या दुकान कम घरासमोर एक स्त्री अॅना (नतालिया कौर) व तिची
मुलगी नायोमी (दिया चलवाड) राहत असतात. नायोमी त्याला हँडसम म्हणत असते. त्याचा एकटेपणा
तिच्यामुळे दूर राहत असतो. तिच्या सहवासात त्याला त्याच्या बायकोची रुक्षिदाची
(श्रुती हासन) आठवण येत असते. एके दिवशी काही लोकं नायोमीच्या आईला कुठेतरी घेऊन
जातात. सोबत नायोमीला सुद्धा. तिच्या आईला नेणारे केविनची (निशिकांत कामत) माणसं असतात.
आपल्या डोळ्यादेखत नायोमीचं झालेलं अपहरण रॉकीला त्याला पूर्वीच्या अवतारात यायला
कारणीभूत ठरतं.
दिग्दर्शक निशिकांत कामतनी रिमेक केलेला तिसरा सिनेमा. वर म्हटल्याप्रमाणे
ओरिजिनलमधील काय घ्यावं काय घेऊ नये याचा संभ्रम त्यांना झाला असावा कारण पटकथाकार
रितेश शाहसोबत त्यांनी भारतीय प्रेक्षकांना पचेल अशी कथानकाची रचना केली आहे.
त्यामुळे कोरिअन समाजाचा आरसा असणारी पार्श्वभूमी इथे तद्दन व्यावसायिक सिनेमात
शोभेल अशी झाली आहे. त्यात ठायीठायी जाणवणारा क्लॉस्ट्रोफोबिया इथे नावाला सुद्धा
नाही. गडद, कुंद वातावरण हवं म्हणून गोव्याची केलेली निवड उपरी वाटते. पात्रांचे
वागणे, त्यांचा अवकाश जिवंत वाटत नाहीत. पोलिसी तपास, खलनायक मंडळींचे वागणे या
जसाच्या तश्या नक्कल केलेल्या. कोरिअन पोलीस व गोव्यातील पोलीस यांच्या तपासणी
पद्धतीत फरक असेलच ना. दिग्दर्शक-पटकथाकार याचा विचार न करता थेट त्याची कॉपी
करतात. त्या सिनेमात जे प्रसंग आहेत ते इथे मुळाभरहुकुम उभे केले जातात.
भारतीय वातावरणानुसार त्यात बदल म्हणजे सकृतदर्शनी बदल केला जातो. उदाहरणार्थ
एका प्रसंगात रॉकीला ती मंडळी एक फोन देऊन कॉल करायला सांगतात तेव्हा तो त्यांच्या
मागेमागे येतो तर ते एका कारमधून त्याला वाकुल्या दाखवत निघून जातात. कोरिअन
सिनेमात ही मंडळी नायकाच्या समोरून निघून जातात तेव्हा ते गाडीत डाव्या बाजूला
असतात तर इथे ते उजव्या बाजूला असतात. यात बदल फक्त मंडळींच्या पोजिशनचा झाला.
कथेच्या आशयाला काय नवीन मिळालं. हे फक्त नकलेच्या पातळीवरच राहिलं. तीच बाब
निवेदन शैलीची. इथे नायकाचा भूतकाळ सुरुवातीलाच दाखवून वातावरण निर्मिती केली
जाते. त्यात घटना प्रसंगातून प्रत्येक बाब समोर येते कारण कथानक नायकाच्या
दृष्टीकोनातून पुढे सरकतं.
एके ठिकाणी त्याने सूड घ्यावा का नाही यासाठी वेळ घेतला जातो इथे रॉकी पटकन
निर्णय घेऊन सूड घ्यायला उद्युक्त होतो. कोरिअन सिनेमात नायक व ती छोटी मुलगी
यांच्या नात्याला छोट्या छोट्या प्रसंगातनं अधोरेखित केलं जातं जे त्याच्या नंतर वागण्याची
कारणमीमांसा म्हणून येतं. इथे रॉकी व मुलीच्या नात्याला खोली येत नाही कारण ते
नकलेच्या स्वरुपात असल्यामुळे. कोरिअन दिग्दर्शक ली जोंग-बिओमच्या मुल्यदृष्टीचा
विचार कामत करत नाहीत किंवा केला असेल तर भारतीय प्रेक्षकांना पचणार नाही असा
सोयीस्कर अर्थ काढून त्यातील स्टायलीश गोष्टी तेवढ्या उचलतात. यामुळे सिनेमा भरपूर
अॅक्शन्स असणारा इतकाच राहिला आहे.
अभिनयात निशिकांत कामत सर्वात जास्त प्रभाव टाकतात. त्यांचा “घंटे का मान्तु”
हा संवाद मजा आणतो. इतर मंडळी यथावकाश उत्तम साथ देतात. जॉन एब्राहमने आजपर्यंत
कुठल्या सिनेमात चांगला अभिनय केला आहे हे आठवणं मुश्कील आहे. इथेही त्याने मागील
पानावरून पुढे असाच अभिनय केला आहे.
“डोंबिवली फास्ट” व “मुंबई मेरी जान” सारखे आशयाला महत्व देणारे सिनेमा
बनवणारे निशिकांत कामत आता फक्त रिमेक करणारे चांगले दिग्दर्शक इतपतच राहणार का
असा प्रश्न त्यांचे तिन्ही रिमेक्स बघून वाटतं. यातनं ते बाहेर पडून आशय व
व्यावसायिकता यांचा सुवर्णमध्य असणारा सिनेमा देतील अशी आशा करूया.
रेटिंग २/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २७/०३/२०१६






Comments