कपूर अँड सन्स : अ फॅमिली पोर्ट्रेट

सर्वच कुटुंबात कलह असतात. काही ना काही कारणाने नेहमी वाद-प्रतिवाद चालू असतात. कलहाचं प्रमाण किती यावर ते छोटं कुटुंब, सुखी कुटुंब आहे का हे दिसून येतं. त्याला आर्थिक, सामाजिक स्तर काही एक प्रमाणात कारणीभूत असतो. सुखवस्तू कुटुंबात वरकरणी सर्व आलबेल आहे असं दिसतं कारण आर्थिक चणचण ही मुख्य अडचण नसते, अर्थात असं नेहमीच असतं असंही नाही. तरीही कुटुंबातल्या व्यक्तींचा एकमेकांशी कसा व्यवहार आहे यावरही कलह अवलंबून असतात. त्यातनं उद्भवणाऱ्या परिणामांवर मात्र कुणाचाच नियंत्रण नसतं. कपूर अँड सन्समधल्या व्यक्तींना सुद्धा याची जाणीव होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

नव्वद वर्षांचे अमरजीत कपूर (ऋषी कपूर) हे त्यांचा मुलगा हर्ष (रजत कपूर) व सून सुनिता (रत्ना पाठक शाह) यांच्यासोबत कुन्नूरमध्ये राहत असतात. त्यांना कधी एकदा मरतो याची घाई लागलेली असते. दररोज मी कसा मरेन याचाच ते सराव करत असतात. त्यांच्या या नाटकी वागण्याला मुलगा व सून दोघेही कंटाळलेले आहेत. त्यातच सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. ताबडतोब त्यांच्या दोन्ही नातवांना राहुल (फवाद खान) व अर्जुन (सिद्धार्थ मल्होत्रा) जे अनुक्रमे लंडन व न्यू जर्सीला राहत असतात बोलावण्यात येतं. ते येतात. चार दिवसांसाठी आलेले दोघेही मात्र बदललेल्या घरच्या वातावरणा पुढे हबकून जातात.

पटकथाकार आयेशा ढिल्लन व दिग्दर्शक शकून बत्रा यांचा आपल्याला काय दाखवायचं आहे यावर पूर्ण विश्वास आहे. ते कसं आणि किती पद्धतीत यावं याचाही आराखडा त्यांच्या मनात पक्का आहे. त्यामुळे अगदी सहज कपूर कुटुंबात फेरफटका मारल्यासारखं ते संपूर्ण चित्र तयार करतात. ही सहजता सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहते ते दोघांच्या दृष्टिकोनामुळे. तसेच आपल्याला व्यक्ती दाखवायच्या आहेत ना की कॅरीकेचर्स यामुळे सर्वांच्या छोट्या-मोठ्या वागण्याचे, स्वभावाचे तपशील स्पष्टपणे समोर ठेवतात. उभं राहणारं चित्र आश्वासक राहतं. प्रेक्षक त्यात गुंतून राहतो. त्यांच्या प्रत्येक वागण्याला साक्षी राहतो. कुणाचं चूक, कुणाचं बरोबर याचा निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा या उद्देशानेच त्याची रचना ते करतात. त्यामुळे कथेत येणारा अनपेक्षित धक्का का याला याची कारणं त्यांच्यासमोर असल्यामुळे हे आपल्यासोबत पण घडू शकेल याचा विचार जरी मनात आला तरी पुरेसं आहे ही पटकथाकार-दिग्दर्शकाची अपेक्षा.

दिग्दर्शनातली सफाई त्याला फ्रेशनेस वाढवते. शेवट मात्र न पटण्यासारखा. कथेच्या आलेखानुसार शेवट अतिशय योग्य म्हणावा असाच आहे. तरीही त्याचं सोप्या उत्तराकडे झुकणं झुकायला नको होतं असं वाटतं. खासकरून राहुल व अर्जुन यांचं वागणं जे की आज तिशीला आलेल्या पिढीचं प्रतिनिधीत्व करतात हे त्यांच्या निर्णयाशी फटकून वागणारं ठरतं. त्यामुळे कथा एका विशिष्ट उंचीवर जाऊन भारतीय समाजाचं समकालीन स्वरूप न दाखवता हिंदी सिनेमातलं कुटुंब याच पातळीवर राहते. याला पटकथाकार-दिग्दर्शकाचा दृष्टीकोन कारणीभूत ठरतो. अशाच पद्धतीचं एका पंजाबी कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवणारा झोया अख्तर दिग्दर्शित “दिल धडकने दो” मध्ये कुटुंबातील विसंवादाला महत्व होतं. पण विसंवादाकडून सुसंवादाकडे होणारा प्रवास ही कथेची रचना होती. त्यामुळे दोन्हीत काही प्रमाणात साम्य असलं तरी कपूर... चं प्रश्न उपस्थित करणाऱ्या शक्यता असताना चटकन उत्तराकडे झुकणं पटत नाही.

सर्वच कलाकारांचा एकाच पातळीवरचा अभिनय हे हिंदी सिनेमात दुर्मिळच म्हणावं इतकं छान जुळून आलेलं. कलाकारांची निवड भूमिकेला साजेशी असेल तर काय बहार येते हे रजत कपूर, ऋषी कपूर व रत्ना पाठक शाह हे अप्रतिमपणे दाखवून देतात. अनुभवी असण्याचा फायदा हा असतोच त्या पलीकडे पात्रांना स्वतःचं अंतरंग द्यायचं असतं हे प्रगल्भ झाल्यामुळे चटकन येतं. इथे या तिघांचा अभिनय अभिनय न वाटता ते ही पात्रं जगतायत इतका जिवंत झाला आहे. त्याला फवाद खान, आलिया भट व सिद्धार्थ मल्होत्राची योग्य साथ मिळते. भटची भूमिका म्हटली तर महत्वाची म्हटली तर नाही. तरीही ती यांच्यात सहज मिसळून जाते तसेच कथेला असणारा रोमँटिक अँगल पूर्ण करते. हे भट-मल्होत्राच्या चाहत्यांना सुखावणारं.

“ऑल हॅपी फॅमिलीज आर अलाईक; इच अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी ईन इट्स ओन वे” या वाक्याने टोलस्टोयच्या आना कारेनिनाची सुरुवात होते. यातील उर्वरित भाग कपूर... ला लागू होणारा पण कादंबरीसारखी उंची तो गाठू शकत नाही हे खेदानं म्हणावं लागतं.

रेटिंग ३.५/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २०/०३/२०१६

Comments