तेरा सुरूर : सुमारपट
सिनेमाच्या एका
प्रसंगात नायिका ताराला हॉस्पिटलमध्ये ठेवलेले असते. ती ड्रग्स बाळगण्याच्या
आरोपाखाली जेलमध्ये असते पण ती तिथे हाताची नस कापून घेते. अर्थात पोलिसांच्या पहाऱ्यात.
जेव्हा नायक रघू तिला सोडवण्यासाठी येतो तेव्हा ते पोलीस आत खोलीत तिच्या बेडजवळ
थांबलेले असतात. रघू त्यांना बंदूक दाखवून तिला तिथनं घेऊन जातो. आता प्रश्न असा
उपस्थित होतो जर पोलीस पहारा देत असतील तर ते खोलीच्या बाहेर का थांबू नयेत? रघू
तिला सोडवायला येईल हे त्यांना माहित असेल तर त्यांनी थोडी अधिक काळजी घ्यायला
नको! असे प्रश्न प्रेक्षकांना पडतात पण दिग्दर्शकाला पडत नाहीत कारण ते याच्याकडे
पुरेश्या गांभीर्याने बघत नाहीत. वरील प्रसंग उदाहरणार्थ म्हणून सांगितला. संपूर्ण
सिनेमात असेच बाळबोध घटना, प्रसंग दाखवण्यात आले आहेत.
तारा वाडिया (फराह
करिमी) डब्लिन, आर्यलंडच्या विमानतळावरून टॅक्सी करून निघाली आहे. वाटेत पोलीस
पकडतात. तिच्या सामानात एका पुस्तकात ड्रग्स सापडतात. तिला जेलमध्ये वकील एली
जार्डन (मोनिका डोग्रा) येऊन भेटते. ती तिची केस लढवणार असते. तारा रघूला (हिमेश
रेशमिया) भेटायची इच्छा व्यक्त करते. इकडे भारतात गँगस्टर असणारा रघू एका मोठ्या
ड्रग्स सप्लायरचा खातमा करतो. नंतर त्याला एका क्लबमध्ये एक गूढ स्त्री भेटते.
तिच्यासोबत रात्र घालवल्यावर तो हे ताराला सांगतो. तारा चिडून त्याच्याशी संबंध
तोडते. डब्लिनहून फोन आल्यावर खोए हुए प्यार को पाने के लिए रघू डब्लिनला जातो.
तिथे चौदा वेळा जेल तोडून फरार होणाऱ्या पण आता एका जेलमधेच असणाऱ्या रॉबिन “बर्ड”
धर्मराज सँटिनोला (नसिरुद्दीन शाह) भेटतो. रॉबिन त्याला मदत करायचं आश्वासन देतो.
वर वर्णिलेला प्रसंग
जेव्हा येतो तो पर्यंत खुर्चीला आपण खिळून का बसलोय याचं दुःख करावं का की
निर्माता-दिग्दर्शकाला शिव्यांच्या लाखोल्या वाहाव्यात असं प्रेक्षकांना वाटल्या
वाचून राहवत नाही. कारण दिग्दर्शक शॉन अरान्हा (तुक्का फिट व हाईड अँड सीक)
त्यांना सुरुवातीपासून असं काही दाखवतात की प्रेक्षक वैतागून जातात. दोन सिनेमांचा
अनुभव असणारा दिग्दर्शक साधे साधे प्रसंग बाळबोधपणे का चित्रीत करतो याचं आश्चर्य
वाटत राहत. तीच बाब पटकथाची. एकतर कथेला निश्चित खलनायक व त्याची कारस्थानं यांची
भक्कम साथ आहे पण पटकथाकार नीरजा रामसे कुठेही प्रेक्षकांनी थोडंसं गुंतून राहावं
असा आकार देत नाहीत.
नायक रघू एक गँगस्टर
असेल तर त्याला किमान अक्कल असावयास हवी की दुसऱ्या देशात जरी गेलो असलो तरी तिथल्या
पोलीस व गुन्हेगारी विश्वात थोडी हालचाल केली की बऱ्याच गोष्टींचा सुगावा लागू
शकतो. तो पर्यटनाला आल्यासारखा अख्ख्या डब्लिनमध्ये फिरत असतो. अन् शेवटी रॉबिनला
भेटतो. तसेच ज्या पद्धतीने तो ताराशी संपर्क साधून तिला बाहेर काढायचा प्लान करतो
ते तर कित्येक वेळा हिंदी सिनेमात येऊन गेलेले आहे. त्यामुळे त्याचं वागणं व बोलणं
याचा पायपोस लागत नाही.
दिग्दर्शकाला आपले
नायक-नायिका सुंदरच दिसायला हवेत याचा अट्टाहास का ते उमगत नाही. दोघेही
स्लो-मोशनमध्ये असंख्य ठिकाणी कुठून तरी चालत येताना दाखवण्यात येतं, कशासाठी!
त्यांना कसं चालता येतं हे प्रेक्षकांना कळावं म्हणून. नायक हिमेश नेहमीच टाईट
जीन्स अन् टी-शर्टमध्ये नाही तर सिक्स पॅक्स दाखवत. नायिका तोकड्या कपड्यात “सत्यम
शिवम सुंदरम” मधल्या झीनत अमानला मागे टाकण्याच्या स्पर्धेत. हे संपलं की असंख्य
वेळा एरियल फोटोग्राफीचं प्रदर्शन. ड्रोनचा वापर करून घेतलेले असंख्य शॉट्स डब्लिनचं
विहंगम दृश्य दाखवतात. त्यांचं प्रयोजन कशासाठी ते मात्र कळत नाही.
अभिनयात नसिरुद्दीन
शाहच काय ते प्रभावी ठरतात. शेखर कपूर, कबीर बेदी, मोनिका डोग्रा व शेरनाझ पटेल
यांनी का म्हणून सिनेमा केला असा प्रश्न त्यांना सुद्धा पडला असेल. फराह करिमीला
सुंदर दिसण्यापलीकडे व रडण्यापलीकडे काम दिग्दर्शक देत नसल्यामुळे ती ते चोखपणे
करते. हिमेश रेशमिया अभिनय करू शकतो हे त्याने “खिलाडी ७८६” मध्ये मनसुख देसाई
नावाच्या लग्न लावणाऱ्या गुजराती माणसाची त्रोटक भूमिका करून दाखवून दिलं होतं. इथं
स्वतःच्या प्रेमात पडलेला अभिनेता एवढच काम त्याने केले आहे. दगडी चेहऱ्याने
वावरणे मात्र तो उत्तम करतो. सिनेमाभर मी कसा कसा दिसेन याकडेच त्याने व
दिग्दर्शकाने लक्ष दिल्यामुळे ते अती होतं.
श्रवणीय गाणी व
नितांत सुंदर डब्लिन हेच काय ते सिनेमागृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना लक्षात राहतं.
रेटिंग १/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह १३/०३/२०१६





Comments