की अँड का : उथळ श्रमविभागणी

भारतीय स्त्री-पुरुषांच्या भूमिका जन्मतः ठरलेल्या असतात. स्त्री असेल तर चूल-मुल व रांधा-वाढा-उष्टी काढा तर पुरुष असेल तर घरचा कर्ताकरविता, पैसे कमावणारा, सुरक्षितता देणारा. या भूमिका वर्षानुवर्षे कुठलीही चिकित्सा न करता बिनबोभाटपणे दोन्ही बाजूकडून पार पाडल्या जात आहेत. कधी काळी कुठल्या तरी समाजपुरुषाने केलेली ही श्रमविभागणी आजही तितकीच सक्षमपणे चालू आहे. मेट्रोसेक्स्युअल पुरूषांबाबत मात्र हे म्हणता येणार नाही निदान ते स्त्रियांच्या कामात मदत करतात किंवा तसा बदल त्यांच्यात दिसतो. श्रमविभागणीत पूर्णतः अदलाबदली झालीय असं झालेलं नाही. तरीही समजा एखाद्या पुरुषाने स्वतःहून एखाद्या स्त्रीसारखं गृहिणीपद घेतलं तर काय होईल हे आर. बाल्की की अँड का मध्ये मांडायचा प्रयत्न करतात.


कबीर बन्सल (अर्जुन कपूर) विमानात रडत बसलाय. त्याच्या बाजूला किया (करिना कपूर खान) बसलीय. तिला आश्चर्य वाटतं एक पुरुष असून तो का रडतोय. कारण त्याच्या आईला जाऊन आता दहा वर्ष होत आलीयत. त्याला तिची आठवण येत असते. व्हिस्की पिण्याच्या बहाण्याने त्यांच्यात मैत्री होते. त्याला मात्र आपल्या आईसारखं ‘आर्टिस्ट’ व्हायचं असतं. ती एक उत्तम गृहिणी असते आणि आपणही तसेच व्हावं अशी त्याची इच्छा असते. किया त्याच्या इच्छेला रुकार देऊन त्याला आपल्या एनजीओ चालवणाऱ्या आईला (स्वरूप संपत) भेटवते. कबीरच्या वडिलांच्या (रजित कपूर) इच्छेविरुद्ध दोघे लग्न करतात.

आर. बाल्कींची संकल्पना खूप छान आहे. वहीवाटेने चालत आलेल्या भूमिका जर बदलल्या तर काय होईल हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. तरीही ही संकल्पना पूर्णपणे नवीन आहे अशातला भाग नाही. या आधी संजीव कुमार, मौसमी चटर्जी अभिनीत ‘इतनी सी बात’ मध्ये अशाच स्वरुपाची कथा होती. पण तिथे नायक-नायिकेने स्वतःहून भूमिकांची अदलाबदल केली होती. इथे नायक स्वतः ला पैसे कमावणे, करिअर वगैरे गोष्टींपासून दूर ठेवतोय. त्याचा उद्देश स्पष्ट आहे. नायिकेला मुल वगैरे जबाबदारी नकोय. तिला करिअरमध्ये स्वतःच्या मर्यादा तपासण्यात जास्त रस आहे. त्यामुळे ते एकमेकाला पूरक आहेत. दोघांच्या गरजा भागतायत. त्यामुळे संसार सुखाचा होईल असा कयास आहे.

संकल्पना छान असली तरी ती पोचवण्यासाठी पटकथा दोषरहित हवी. इथे नेमकं त्याचीच कमतरता जाणवते. एकदा दोघांच्या भूमिका प्रस्थापित झाल्यावर पुढे त्याचं छोट्यामोठ्या तपशीलासहित संपूर्ण चित्र उभं राहणं अपेक्षित आहे. आर. बाल्की आपल्याला संकल्पना खूप भारी सुचलीय या आविर्भावात पटकथेतल्या कच्च्या दुव्यांकडे ढोबळपणे बघतात. किया-कबीर ज्या सोसायटीत राहत असतात तिथल्या बायका कबीरसोबत अगदी सहज मिळूनमिसळून राहतात. त्यांना एकदा सुद्धा प्रश्न पडत नाही की पुरुष असून तो अशी जीवनशैली का अंगीकारतोय. 

किंवा कबीरची मर्दानगी दाखवण्यासाठी एक छोटासा मारामारीचा प्रसंग येतो त्याचं प्रयोजन कशासाठी ते कळत नाही. लग्नाच्यावेळी कबीरने मंगळसूत्र घालणे म्हणजे बाळबोधपणाच. त्याने गृहिणीपदाची जबाबदारी घेतली म्हटल्यावर त्यात तो ते कसं निभावतो हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी अशा सामाजिक संकेतांच्या विरोधात जायची गरज कशाला हवी. आपण काहीतरी बंडखोरी करतोय असा विचार बाल्कींचा असावा. तो प्रभावित करत नाही हे निश्चित.

अशा सदोष पटकथेत जान आणतात ते सर्वच कलाकार. अर्जुन कपूर व करिना कपूर खान नायक-नायिकेपेक्षा किया व कबीर म्हणून जास्त लक्षात राहतात. करिनासाठी ही भूमिका खूप अवघड नसली तरी ती अनुभवी असल्यामुळे ते सहज निभावून नेते. अर्जुन कपूरला करिअरसाठी ही भूमिका योग्यच. रजित कपूर व स्वरूप संपत कमी प्रसंग असले तरी लक्षात राहतात.

गाण्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड मुंडा’, ‘हाय हील्स’ हे उडत्या ठेक्यांची गाणी धांगडधिंगा घालण्यासाठी मस्तच झालीयत. तर ‘जी हुझूरी’ सिच्युएशनला फिट्ट बसणारं. गेल्या काही वर्षात गाण्यांना म्हणाव्या तश्या कथेत जागा नसतात त्यामुळे जास्ती करून ही पार्श्वभूमीलाच वाजतात. त्यामुळे त्यांचं विस्मृतीत जाणं लवकर घडतं.     

‘चीनी कम’ व ‘पा’ मधून विषयाच्या वेगळेपणासोबत मोठ्या कलाकारांना घेऊन व्यावसायिकता जपता येते हे बाल्कींनी दाखवून दिलं होतं. ‘शमिताभ’ चं गणित चुकलं होतं. इथे ते सुधारण्याचा प्रयत्न जोरदार होता पण निव्वळ संकल्पना सिनेमाचा प्रभाव वाढवू शकत नाही. त्याला निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावरची भक्कम साथ हवी. आपल्याच पहिल्या दोन सिनेमांचं परत एकदा अवलोकन त्यांनी केलं तर कदाचित पुढील निर्मिती उत्तम होईल.

रेटिंग : २.५/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह ०३/०४/२०१६

Comments