फॅन : शाहरूखीय जुगलबंदी

‘होली स्मोक’ सिनेमातील एक तरुण स्त्री पात्र टॉम क्रुझची प्रचंड चाहती असते. नवऱ्याशी संग करत असताना सुद्धा तिला टॉम क्रुझच आपल्याशी संग करतोय असं वाटत असतं. सर्वसामान्य ऑस्ट्रेलिअन कुटुंबातील असून पण दूरदेशी असणाऱ्या एका स्टार अभिनेत्याप्रती असणारं प्रचंड आकर्षण तिच्यासाठी इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं असतं. स्टार अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्याबद्दल असणारं आकर्षण, त्यांच्या पडद्यावरील प्रतिमा ह्या खऱ्या मानण्याचा व तो/ती आपल्यातच वसलेली आहेत याची असणारी प्रचंड जाण ही त्यांना भेटण्याच्या, त्यांचे वाढदिवस साजरे करण्याच्या पलीकडे जाणारी असते. खरं आयुष्य व पडद्यावरील प्रतिमा यात महदंतर असते याची जाणीव सर्वांनाच असते असे नाही जसे की वरील उदाहरणात सांगितले तसेच ते गौरव चान्दनाच्या बाबतीत सुद्धा लागू होते.

दिल्लीच्या इंदरविहारमध्ये राहणारा गौरव चान्दना (शाहरुख खान) हा एके सायबर कॅफे चालवणारा तरुण आर्यन खन्ना (शाहरुख खान) या बॉलीवूड सुपरस्टारचा प्रचंड चाहता असतो. अगदी लहानपणीपासून त्याने त्याचे सर्व सिनेमे बघितलेले असतात. त्याचे फोटोज व इतर गोष्टी गोळा केलेल्या असतात. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी त्याला आर्यन खन्नाच दिसत असतो. त्याच्या शेजारी राहणाऱ्या व सतत काही ना काही कामानिमित्त त्याच्या सायबर कॅफेत येणाऱ्या ‘मिस बीपीओ’ नेहाचं (श्रिया पिळगावकर) त्याला सुप्त आकर्षण आहे. आर्यन खन्नाच्या वाढदिवशी त्याला भेटायचं म्हणून घराजवळच्या एका विविध गुणदर्शन स्पर्धेत भाग घेऊन वीस हजार रुपयांचं बक्षीस मिळवून तो मुंबईला रवाना होतो. तिथे गेल्यावर त्याच्यासमोर आर्यन खन्नाला भेटणं हे एक दिव्यच असतं. जगभरातून आलेले त्याचे चाहते बघून तो हबकून जातो. त्यातच आर्यन खन्नाने एका उभरत्या अभिनेत्याला सिद कपूरला भर पार्टीत कानफटात मारलेली असते. त्यामुळे त्याने चिडून आर्यनवर कोर्ट केस करण्याची धमकी दिलेली असते. आपल्या आवडत्या देवता समान अभिनेत्याला त्रास देणाऱ्या सिद कपूरला धडा शिकवायचा असं गौरव ठरवतो.

कथा-दिग्दर्शक मनीष शर्मा, पटकथाकार-संवाद लेखक हबीब फैझल आणि शरत कटारिया यांनी एक चांगली संकल्पना त्यातल्या शक्यतांसह फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांना पाच मिनिटं का होईना भेटावं वाटत असतं. सर्वांनाच ते शक्य होत नाही तेव्हा अशा दुखावलेल्या फॅनने जर त्याच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल अशी ती संकल्पना. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आधीच त्यावर होत असलेला परदेशी संकल्पनेवर आधारित असणारा आरोप जरी मान्य केला 

तरी एकूण भारतीय वातावरणात ही संकल्पना योग्यपणे दाखवता येईल हे निर्माता-दिग्दर्शकांचा विश्वास सार्थ ठरवते ते प्रत्यक्ष शाहरुखच्या आयुष्याशी असणाऱ्या साधर्म्याशी. शाहरुखचं सर्वसामान्य घरातून येऊन मेहनतीने आज असलेलं आढळपद मिळवणे एखाद्या सिनेमातच शोभावं असं. तसेच त्याचे जगभरात सर्वदूर असणारे चाहते हा सुद्धा चर्चेचा विषय. तेव्हा त्यालाच केंद्रस्थानी ठेवून रचलेली ही कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. गौरव आर्यनच्या पाठीमागे इतक्या टोकाच्या भूमिकेतून का वागतो याचं उत्तर ती द्यायचा प्रयत्न करते ते एखाद्या थ्रिलिंग राईडच्या स्वरुपात.

तरीही सिनेमा म्हणून बरेच दोष आहेत जे पटकथेत तसेच राहतात. खासकरून मध्यंतरानंतर सिनेमाचा एकसुरीपणा कंटाळवाणा होण्याची शक्यता जास्त राहते. पटकथेतले दोष हे मुख्यत्वे गौरवच्या भूमिकेशी आणि तो ज्या पद्धतीने आर्यन खन्नाला त्रास देत असतो त्याच्याशी निगडीत आहेत. एकदा तो त्याच्या दुखावलेल्या मनाला चुचकारण्यासाठी आर्यन खन्नावर सूड उगवतो असं ठरतं तेव्हा त्याच्या मानसिकतेचा वेध घ्यायची मोठी संधी पटकथाकार-दिग्दर्शक यांना होती. दुर्दैवाने ते याचा विचार न करता एखाद्या सूडपटाला साजेसं रुपडं गौरवच्या व्यक्तिरेखेला देतात त्यामुळे त्याची कृत्यं दिसून येतात पण त्याच्या मनात जो राग आहे तो इतका दीर्घकाळ का राहिला याची कारणमीमांसा मिळत नाही. 

गौरवचं वागणं एका टप्प्यानंतर बालिश व हास्यास्पद वाटायला लागतं ते यामुळे. कारण प्रत्यक्ष आयुष्यात हे चाहते हिरमुसून त्यांच्या खऱ्या आयुष्याला जवळ करतात तेव्हा त्यांना पडद्यावरील प्रतिमा व स्वतःचं आयुष्य यातील फरक कळायला लागल्यामुळे. गौरव हा पंचवीस वर्षांचा तरुण आहे. तो तरुण असून तडकाफडकी निर्णय घेऊन परिणामांचा विचार करणारा नाही असं थोड्या काळापुरत गृहीत धरलं तरी कुठे ना कुठेतरी आपण जे करतोय ते योग्य नाही याची जाणीव त्याला होतच असणार, ते मात्र कुठंच दिसून येत नाही.

श्रिया पिळगावकर, दीपिका अमीन, योगेंद्र टिकू व सयानी गुप्ता यांची उपस्थिती लक्षात राहते. ज्याच्यासाठी हा सिनेमा बनवला तो शाहरुख खान मात्र या सिनेमाची जान आहे. एकखांबी तंबू, गोळीबंद अभिनय, भूमिका जगणे वगैरे विशेषणं थिटी पडवीत इतका अफलातून अभिनय त्याने केला आहे. ‘डर’, ‘अंजाम,’ व ‘बाजीगर’ मध्ये त्याने नकारात्मक भूमिका केल्या होत्या. गौरव चान्दना ही व्यक्तिरेखा वरील तीन सिनेमातल्या व्यक्तिरेखेचच पुढील रूप. 

परत ही व्यक्तिरेखा मेक अप व स्पेशल इफेक्ट्सच्या आत असणारी. तिच्यात असणारे सूक्ष्म कंगोरे तो इतक्या सहजतेने व सफाईदारपणे दाखवतो की एक क्षण वाटतं खरोखर शाहरुख नाहीच आहे. तिचं बाब आर्यन खन्नाच्या कर्तृत्ववान मग्रुरीची. आपण मेहनतीने उभं केलेलं विश्व एक फॅन येऊन उधळतो आहे याची भीती तंतोतंत त्याच्या डोळ्यात दिसून येते. हे असं दोन्हीतला जमीन-अस्मानचा फरक क्षणार्धात तो दाखवतो. अर्थात या आधी सुद्धा त्याने ‘डुप्लीकेट’ मध्ये दुहेरी भूमिकेतला फरक अप्रतिमपणे उभा केला होता. इथे त्याच्या दोन पावलं पुढे गेलेला आहे.

एकुणात अप्रतिम अभिनयाने सजलेला हा सिनेमा त्यातील गुण-दोषासकट शाहरुखसाठी आवर्जून बघावा असाच आहे.

रेटिंग ३/५

पूर्वप्रसिद्धी : १७/०४/२०१६

Comments

devendra said…
लेख सुद्धा अप्रतिम. बॉक्स ऑफिस वर काय व्यायचे ते होईल. पण शाहरुखला खरेच गरज होती एका चांगल्या सिनेमाची.