नील बटे सन्नाटा : स्वप्नाळू आईची भिडणारी गोष्ट

ताजमहालच्या पार्श्वभूमीवर चंदा आणि अपु बोलत बसलेल्या. चंदा तिला स्वप्न का बघायची? ती साकार करण्यासाठी किती व कशा पद्धतीने मेहनत घ्यायची? कुणी आपल्या स्वप्नांच्या आड येत असेल तर त्यांच्याशी कसं वागायचं? वगैरे बाबींबद्दल बोलत असते. हे सांगणं सिनेमात ज्या टप्प्यावर येतं तो पर्यंत बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात. दहावीत असणारी अपु दहावी नंतर काय या प्रश्नावर एक सोपं उत्तर सांगून तिचे तोंड बंद करत असते. चंदासाठी हे आव्हान असतं तिला या उत्तरापासून परावृत्त करायचं. ते ती कसं करते याची कथा म्हणजे ‘नील बटे सन्नाटा’ हा सिनेमा.

चंदा शिवलाल सहाय (स्वरा भास्कर) ही अपेक्षा सहायची (रिया शुक्ला) आई. आग्रा शहरातल्या एका गरीब वस्तीत दोघी राहत आहेत. चंदा कामवाली बाई म्हणून डॉक्टर दिवाणबाईंच्या (रत्ना पाठक शाह) घरी काम करत असते. तसेच उरलेल्या वेळात एका शूज बनवायच्या कंपनीत नोकरी करत असते. 

अपेक्षा अभ्यासात लक्ष देत नसते त्यामुळे दरवर्षी काठावर पास होऊन वर्षागणिक जाडजूड होणारी पुस्तके वाचणेच आपल्या नशिबात आहे असं तिला वाटत असतं. चंदा तिला एकदा विचारते तुला दहावी नंतर काय करायचं आहे. डॉक्टर की इंजिनिअर. अपेक्षाचं उत्तर असतं ‘डॉक्टर का बेटा डॉक्टर, इंजिनिअर का बेटा इंजिनिअर तो बाई की बेटी बाई ही बनेगी...’ तिचं इतकं स्पष्ट उत्तर ऐकून चंदा बिथरते. यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे म्हणून दिवाण बाईंच्या सहाय्याने एक अशक्यप्राय गोष्ट तडीस न्यायचा घाट घालते.

कथा-पटकथाकार-दिग्दर्शक आश्विनी तिवारी व सह-पटकथाकार प्रांजळ चौधरी-नीरज सिंग यांनी एका आईने आपल्या मुलीने अभ्यास करून आयुष्यात एखादं लक्ष्य गाठावं यासाठी काय करेल या संकल्पनेवर शक्यतेच्या पातळीवर काय होईल याचा चांगला विचार केलेला आहे. चंदाने घेतलेला निर्णय खरंतर अशक्य कोटीतला आहे. वास्तव आयुष्यात असं होईल याची खात्री देता येत नाही कारण चंदा ज्या आर्थिक स्तरातून येते तिथे आजही शिक्षणाबद्दल असणारी अनास्था आपण बघतच आलोय. तरीही परिस्थितीवर मात करण्यासाठी उच्च शिक्षण घेणे हाच उपाय आहे याची जाणीव सुद्धा चंदाला आहे. पतीचं अकाली निधन, गरीब असल्यामुळे दोन वेळच्या जेवणासाठी करावे लागणारे काबाडकष्ट तरीही परिस्थिती जैसे थे असणे यामुळे पिचून गेलेल्या चंदाला नोकरीमुळे व दिवाण बाईंमुळे व्यावहारिक शहाणपण आलेले आहे.

पटकथाकार यातील सर्व गोष्टींचा मुळातूनच विचार करतात. शाळेतलं वातावरण, चंदाची नोकरी, अपूचं परिस्थिती शरण असणे, टीनेजर असल्यामुळे ज्या त्या गोष्टीत डोक्यात राख घालून घेणे, रणबीर कपूरचं अत्याकर्षण, चंदाचं आलेल्या अनुभवतनं चटकन शिकून निर्णय घेणे वगैरे छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा विचार संहितेच्या पातळीवरच केलेला आढळतो. त्यामुळे संवाद, भाषा यांच्यात असलेली सहजता गुंतून ठेवते. नील बटे सन्नाटाचा अर्थ पात्रांच्या जगण्याशी असणं त्यांना काय सांगायचं आहे हे दर्शवते. काही काही ठिकाणी मात्र अपु व तिच्या मित्रांच्या भाषेवर बम्बैय्या हिंदीचा प्रभाव जाणवतो पण तो दुय्यम मुद्दा आहे. आश्विनी तिवारींचा हा पहिलाच सिनेमा हे लक्षात येत नाही ते त्यांच्या जाहिरात क्षेत्रातल्या अनुभवामुळे. त्यामुळे त्या छोटे छोटे नेमके प्रसंग मांडून कथा उलगडत नेतात. मेलोड्रामा, डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग यांना फाटा देतात, आपली पात्रं काय व कशी वागणार आहेत याची सुस्पष्ट कल्पना त्यांना असल्यामुळे प्रसंग वास्तववादी होतील याकडे त्यांचं लक्ष असतं.

रिया शुक्ला, पंकज त्रिपाठी, रत्ना पाठक शाह व अपुचे वर्गमित्र यांची कामे उत्तम. स्वरा भास्करची नायिका असणारी पूर्ण लांबीची ही पहिलीच भूमिका. नेहमी सहाय्यक भूमिकेत दिसणारी ही अभिनेत्री दुय्यम भूमिकेत सुद्धा उठून दिसणारी. त्यामुळे नायिका म्हणून ती व्यक्तिरेखा कशी निभावेल याची उत्सुकता होतीच. इथे शंभर टक्के खरी आई शोभावी इतका उत्तम अभिनय तिने केला आहे. वयाचा अडसर न जाणवता. अर्थात कथेत सर्वात जास्त वेळ पडद्यावर असणारी व केंद्रस्थानी असणारी व्यक्तिरेखा तिच्या वाट्याला आली असली तरी एका आईची होणारी घुसमट, वैताग, परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात कसं करता याचा सतत चाललेला विचार करणाऱ्या स्त्रीला ती त्रिमिती आकार देते. दिग्दर्शकाची निवड सार्थ ठरवते.

पहिल्याच सिनेमात एका चांगला विषय मांडणाऱ्या आश्विनी तिवारी याही पुढे उत्तम आशय असणारे सिनेमे देतील याची आशा बाळगायला हरकत नाही.

रेटिंग ३/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २४/०४/३०१६

Comments