लव्ह गेम्स : मिळमिळीत थ्रिलर

विक्रम भटचा सर्वात चांगला सिनेमा गुलाम. (सर्वश्रेष्ठ म्हणणं अवघड आहे.) ऑन द वॉटरफ्रंटचा प्रभाव असला तरी मुंबईतल्या एका वस्तीत घडणारी कथा सर्वच पातळीवर जमून आलेली असल्यामुळे आजही बघणीय आहे. खासकरून आमीर खानच्या कारकिर्दीतील एक उत्तम भूमिका असलेला हा सिनेमा भारतीय पार्श्वभूमीत चपखल बसणारा होता. त्या आधीचे व नंतरचे सिनेमे मात्र म्हणावे तितके प्रभावी नव्हते व राज किंवा १९२० चं बॉक्स ऑफिस सक्सेस इतरही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून होतं. भटच्या सिनेमात स्वतंत्र कथा-पटकथा अशा नसतात कुठल्या ना कुठल्या हॉलीवूड सिनेमाच्या कथेचा प्रभाव असतोच. त्यामुळे सिनेमा बघताना या आधी आपण हे कुठेतरी बघितलं आहे याची टोचणी लागून राहते. लव्ह गेम्स ही याला अपवाद राहत नाही.

रमोना रायचंद (पत्रलेखा) या मुंबईतल्या एका पेंटहाउसमध्ये राहणाऱ्या आणि पेज थ्री पार्टीज एन्जॉय करत आयुष्य घालवणाऱ्या तरुणीचा तीनच गोष्टींवर विश्वास असतो. जिंकणे, कोकेन आणि लव्ह गेम्स. तिचा मित्र सॅम उर्फ समीर सक्सेना (गौरव अरोरा) जो तिच्यासाठी फक बडी असतो याच्यासोबत ती एक अॅडव्हेंचर तडीस न्यायचा प्लॅन करते. लव्ह गेम्स नावाच्या एका पुस्तकानुसार ते ठरवतात की पेज थ्री पार्टीत येणाऱ्या सर्वात आनंदी जोडप्याला आपल्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याशी शय्यासोबत करून त्याचे व्हीडीओज एकमेकांशी शेअर करायचे. एका जोडप्यावर यशस्वी प्रयोग केल्यावर त्यांची गौरव अस्थाना (हितेन तेजवानी) व अलिशा अस्थाना (तारा अलिशा बेरी) या जोडप्याची एका पार्टीत भेट होते. मात्र अलिशाला बघून समीर चलबिचल व्हायला लागतो.

कथा एखाद्या क्राईम थ्रिलर कादंबरीत शोभेल अशी असली तरी तिला विश्वसनीय वाटावी अशा पद्धतीने पटकथाकार-दिग्दर्शक भट आकार देत नाहीत. सकृतदर्शनी सर्व काही व्यवस्थित म्हणजे तार्कीकपणे चालू आहे असं वाटत असलं तरी थोडा विचार करता त्यातले लूपहोल्स दिसायला लागतात. भटनी ज्या कुठल्या हॉलीवूड सिनेमावर याची कथा बेतली आहे किंवा स्वतंत्र असली तरी त्यातील धक्क्याची शक्यताच तेवढी उचलली व त्यानुसार कथानकाची रचना केली. त्यामुळे पात्रांच्या वागण्याला कारणमीमांसा मिळत असली तरी ती वास्तविक वाटत नाही. त्यांचं वागणं ढोबळ राहतं. त्यात कृत्रिमता येते. जे की चांगल्या क्राईम थ्रिलरमध्ये अपेक्षित नाही. पात्रं जे काही करतात ते तार्किक असलं तरी ते पुरेसं नाही त्यांच्या व्यक्तिमत्वात ते मिसळणं गरजेचं असतं. व्यक्तिमत्व जितकं जिवंत तितकी प्रेक्षकांची गुंतवणूक जास्त. दुर्दैवाने फुलवता येण्यासारख्या खूप शक्यता असताना भट ते करत नाहीत.

मुळातच पटकथेत दोष राहिल्यामुळे त्याचे परिणाम पुढे सर्वच विभागात दिसून येतात. प्रसंगांचं चित्रीकरण, पात्रांच्या हालचाली, संवाद, संकलन वगैरे बाबी फसायला लागतात. पडद्यावर त्यामुळे प्रसंगांची मालिका बघतोय असं होतं. याचा दोष सर्वार्थाने दिग्दर्शकाकडे जातं. आतापर्यंत अठ्ठावीस सिनेमे बनवणारे भट साधे साधे प्रसंग प्रभावीपणे प्रेक्षकांनी गुंतून राहावं अशा पद्धतीने चित्रित करत नाहीत. ज्या श्रीमंती वातावरणात पात्रं राहतात तो अवकाश जिवंत होत नाही कारण दिग्दर्शकाला फक्त त्यातील दृष्टी सौंदर्य पकडण्यात स्वारस्य जास्त आहे. इथे दिग्दर्शकाने कौशल्य दाखवणं अपेक्षित नाही तर किमान आहे ते तरी विश्वसनीय वाटावं.

जी बाब पटकथा-दिग्दर्शनाची तीच अभिनयाची. पत्रलेखा, तारा बेरी, हितेन तेजवानी व नवोदित गौरव अरोरा हे आपण किती कृत्रिम, अनैसर्गिक अभिनय करू शकतो याची स्पर्धाच करतात. कुठल्याही एका प्रसंगात किंवा संवादात त्यांनी नैसर्गिक अभिनय केलाय दिसत नाही. हा दोष परत दिग्दर्शकाच्या माथ्यावर बसतो. इतकी वर्ष या उद्योगात व्यथित केल्यावर पण जर आपल्या कलाकारांकडून विश्वसनीय अभिनय करून घेता येत नसेल तर त्याने मागील अनुभवतनं काहीही शिकलेलं नाही असंच म्हणावं लागेल.

यात लक्षात राहतात ती पार्श्वभूमीला वाजणारी संगीतकार संगीत-सिद्धार्थ जोडीने दिलेली गाणी व बॅकग्राउंड म्युझिक. ‘आवारगी’, ‘मोहब्बत’, ‘ए दिल’ ही गाणी कथानकात मिसळत नाहीत पण श्रवणीय. सध्या हिंदी सिनेमात नायक-नायिका प्रत्यक्ष गाणं म्हणतायत असं खूप कमी वेळा बघायला मिळतंय. यामुळे सिनेमा वेगळा ठरत असावा अशी काही अटकळ असावी निर्मात्यांची. तरीही संगीतकार-गायकांची मेहनत कमी ठरत नाही.

एकुणात पंचवीसपेक्षा जास्त सिनेमा देणाऱ्या दिग्दर्शकाने निव्वळ संकल्पना चांगली सुचली म्हणून बनवलेला हा सिनेमा त्याच्यातील प्रगल्भता दाखवत नाही.

रेटिंग १/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह १०/०४/२०१६

Comments