Posts

Showing posts from 2013

अविस्मरणीय सिनेमानुभव : पिफ २००७

Image
पुढच्या वर्षीच्या पहिल्या महिन्यात नवव्या व सोळाव्या दिवसाच्या दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरत आहे. या निमित्ताने मी २००७ साली हजेरी लावलेल्या पिफची आठवण झाली. त्यावेळी सर्व डेलिगेट्सना दिलेली चित्रपट माहिती पुस्तिका मी जपून ठेवली आहे. लातुरात असताना पेपर, साप्ताहिक, मासिक आणि दिवाळी अंकात सिनेमा विषयी अन् फिल्म फेस्टिवलबद्दल खूप वाचण्यात यायचं. दूर एका छोट्याश्या शहरात राहत असल्यामुळे तिथनं फिल्म फेस्टिवलला येणं परवडायचं नाही. त्यामुळे लेख वाचून सिनेमा कसा असेल याचे आडाखे बांधायचो. पण एमएसाठी पुण्यात आल्यावर पिफ अटेंड करायचं असं ठरवलं होतं. पैशाची नेहमीची अडचण होती पण विद्यार्थ्यांसाठी कॉलेज आयडीवर पासेस मिळायचे. मग मनाचा हिय्या करून हॉटेल प्रतीकमधून डेलिगेट पास घेतला आणि एका अद्भुत अनुभवाची सुरुवात झाली. सिनेमा बघण्याचा माझा दृष्टीकोन जसा बदलला तशी नजर बदलली. लातुरात फक्त आणि फक्त हिंदी-मराठी व्यावसायिक सिनेमे बघण्यात पाव आयुष्य गेलं त्याला या निमित्ताने जबरदस्त तडा दिला. ओंजळभर असणारी माझी सिनेमा विषयीची जाण एकदम जागतिक अन् पसाभर झाली. नसलेला पदर फाटून जाईल असे ...

रिमोट

Image
माझ्या एक मित्र नेहमीप्रमाणे संध्याकाळी शाळेतून घरी आला. हात-पाय-तोंड धूऊन गप्पा मारायला बसला. बोलता-बोलता म्हणाला खूप दिवसात डोशे खाल्ले नाहीत. नंतर तो काय बोललाय ते विसरून गेला. सकाळी नाश्त्याला डोशे हजर. त्याला आश्चर्य वाटलं.बर्‍याच दिवसांनी भेटल्यावर मला आवर्जून सांगितलं. मला प्रथम लक्षातच आलं नाही. त्यांनच स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला लातूरला परत कायमचा आल्यापास्न आणि घराची सर्व जबाबदारी शिरावर घेतल्यापास्न घरातील निखळ संवादच संपलाय. तो जे काही बोलतो ते आदेशात रूपांतरित होतय. पैसे कमवून आणणे हे एकमेव काम करत असल्यामुळे त्याचं एकाधिकारशाहीत परिवर्तन झालय. संवाद फक्त एकाच बाजूने होतोय. मला प्रश्न पडला यालाच भारतीय समाजव्यवस्थेची पुरुषसत्ताक मानसिकता म्हणायची का? नंतर मी माझ्या इतर मित्रांच्या आयुष्याचा विचार करायला लागलो तेव्हा थोड्याफार फरकाने हेच चित्र मला दिसून आलं. प्रथम एक नमूद करतो मी ज्या वर्तुळात वावरतो तिथे आई-बहीण-बायको या घरातल्या स्त्री वर्गाने नोकरी/व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहणे अक्षम्य गुन्हा मानला जातो. करियरफ़िरियर तर दूरची बात राहिली. यांच्या घरातील बाय...

लत्तलूर ते लातूर

Image
अतो वक्ष्यामि ते तात भूत्वा चैकमनाः शृणु | सिध्दक्षेत्रस्य नामानि तीर्थानां चरितानि च   ||  ५ ॥ अर्थ :  सिद्धक्षेत्राची नावे व त्यांची वर्णने तू ऐक.  हे क्षेत्र चक्राकार असून ,  एक योजना एवढा त्याचा विस्तार आहे. कृते सत्यपुरं नाम त्रेतायां मधुपुरं स्मृतम | रत्नापुरं तु द्वापारे लातनुरं कलियुगे विदुः || ६ || अर्थ :  या क्षेत्राला कृतयुगात सत्यपुर ,  त्रेतायुगात मधुपूर ,  द्वापरात रत्नापूर तर कलियुगात लातनुर म्हणून ओळखतात. लातूर रेल्वे स्टेशन रत्नापूर माहात्म्याच्या सहाव्या अध्यायात लातूरच्या स्थानाबद्दल व त्याच्या वेगवेगळ्या नावांबद्दल उल्लेख येतो. याच पुस्तकाच्या म्हणजे लातूरचा इतिहास आणि रत्नापूरमाहात्म्य  च्या मलपृष्ठावर लातूरच्या अकरा ग्रामनामांची यादी येते. ते नाम असे आहेत :  लत्तलूर (इ. स. ८१२-१३)   लत्तलूर (इ. स. ८६६)   लत्तलूर (इ. स. १०४०)   लत्तलौर (इ. स. १०८७)   लत्तनूर (इ. स. ११२३)    लत्तलौर (इ. स. ११२८)   लत्तनूर (इ. स. ११८८)   लत्तनूर (इ...

अनरउबिक आणि प्रकाशक

Image
परवा मंगळवारी सकाळी देशमुख आणि कंपनीच्या विनय हर्डीकरांना फोन लावला. त्यांना म्हणालो, "मागच्या महिन्यात एक हस्तलिखीत दिले होते. त्याबद्दल अभिप्राय हवा होता." ते म्हणाले, "मी ते वाचलंय. तू ते कार्यालयात येउन घेऊन जा." बुधवारी सकाळी कार्यालयात जाऊन हस्तलिखीत घेऊन आलो. देशमुख आणि कंपनी (पुणे) हे तिसरे प्रकाशक ठरले ज्यांनी अनरउबिक नाकारली. पहिले दोन म्हणजे पॉप्युलर प्रकाशन (मुंबई) आणि अनुबंध प्रकाशन (पुणे) . यानंतर मेनका प्रकाशन (पुणे) , सायन प्रकाशन (पुणे) , अनुबंध प्रकाशन (पुणे) , गोल्डनपेज प्रकाशन (पुणे) , जनशक्ती वाचक चळवळ (औरंगाबाद) यांनी सुद्धा नाकारली किंवा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना स्वीकारता आली नाही. लोकवाङ्मय गृह (मुंबई) नी वेळेअभावी प्रकाशित करायची असमर्थता दर्शवली. गेल्या एक ते दोन वर्षांपासून मी प्रकाशकांना भेटतोय पण एकही जण त्याबद्दल ना बोलायला तयार आहे ना अभिप्राय द्यायला. त्यामुळे छापील आवृत्ती निघण्याचे दिवस मागे-मागे पडत चाललेत. काय करावे ते कळत नाही.  फक्त पॉप्युलरवाल्यांनी अभिप्राय दिला तो पण कसा!!! तो सोबत जोडला आहे. य...

ज्युरासिक पार्क ३ डी

Image
शिवाजी महाराजांच्या काळात भारतात पहिल्यांदा गोव्यात पोर्तुगीजांनी प्रिंटींग प्रेस आणली. महाराजांना हे माहीत होतं का नाही माहीत नाही पण त्यांनी नक्कीच स्वतःच स्वतःचं चरित्र लिहून त्यांच्या जन्माविषयीचा घोळ मिटवला असता.  तंत्रज्ञान हे भूतकाळ जागं करायला नेहमीच कामाला येतं. इतकं जुनं उदाहरण द्यायचं कारण म्हणजे काल ज्युरासिक पार्क परत एकदा थिएटरमधे बघितला पण थ्रीडीमध्ये वीस वर्षांनतर. आल्फ्रेड हिचकॉकच्या काळातच हे तंत्र निर्माण करण्यात आलं होतं. पण त्याने नाही वापरलं. मला मात्र या चित्रपटाने भूतकाळाची सैर घडवून आणली. त्या वेळी मी आठवीत होतो.  पुण्यातून ज्ञान प्रबोधिनी तर्फे छात्र प्रबोधन नावाचं मासिक चालवण्यात येतं. आमच्या शाळेतल्या वैद्य बाई त्याचं लातूरातलं काम बघायच्या. या मासिका तर्फे दरवर्षी व्यक्तिमत्व विकसन शिबीर भरवण्यात येतं. यात पहिल्या प्रथम इच्छुक मुलांना पुण्यात शिबीर कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण देण्यात येतं. मग त्या मुलांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिबीर घ्यायचं. मला धुळ्याला पाठवण्यात आलं. पुण्यात प्रशिक्षणासाठी आलो तेव्हा पेठेतून फिरताना ज्य...

दि अटॅक्स ऑफ २६ /११ : समकालीन विषय आणि चित्रपट

Image
बऱ्याचदा असं होतं की एखादी हिंसक घटना ही ज्याप्रमाणे सामान्य माणसांना हादरवून सोडते, तशी फिल्ममेकर्सनादेखील. मग ही घटना घडल्यावर नजीकच्या काळात तिच्याकडे एक विषय म्हणून पाहण्यापेक्षा ते ती विसरून जाण्याच्या मागे लागतात. याला प्रामुख्यानं दोन कारणं संभवतात. पहिलं म्हणजे त्या घटनेची प्रॉक्झीमिटी, या घटनेच्या, त्या स्थलकालाच्या संबंधित व्यक्तींच्या ते इतके जवळ असतात, की चित्रपट बांधण्यासाठी जो त्रयस्थपणा लागतो, तो त्यांना मिळू शकत नाही. दुसरं कारण असतं ते या माध्यमांचं व्यावसायिक स्वरुप. चित्रपट चालायचा तर प्रेक्षकांचा प्रतिसाद आवश्यक आहे आणि बहुधा अशा घटनेनंतर प्रेक्षकांचं घटनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असणं त्याला त्या विषयावरच्या चित्रपटाकडे आणणार नाही, तर बरोबर विरुद्ध घेऊन जाईल, अशी शक्यता असते. या दोन्ही कारणांमुळे घटनांना प्रामाणिक स्वरुपात मोठ्या पडद्यावर येण्यासाठी काही एक काळ जावा लागतो. आश्चर्य म्हणजे युद्धासारख्या घटना या अधिक मोठ्या प्रमाणात हिंसेशी संबंधित असूनही त्या सामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर घडत नसल्यानं पडद्यावर लवकर जाऊ शकतात; मात्र रोजच्या आयुष्यात असं काही...

माझं लेखकपण

Image
थर्टी फर्स्टच्या रात्री आम्ही एका मित्राच्या रूमवर सेलेब्रेशन करत होतो. माझा एक मित्र टुन्न होता. बोलता-बोलता तो मित्राच्या रूम पार्टनरला म्हणाला," हा माझ्यावर कादंबरी लिहितोय. याने एक कादंबरीसुद्धा लिहिलीय." मी मात्र विचित्र मनस्थितीत होतो. त्याला काय बोलावं हे सुचलं नाही. मी शांतच राहिलो. परवा दिवशी दै. सकाळचा ८१ वा वर्धापनदिन होता. मी नेहमीप्रमाणे अप्पा बळवंत चौकात गेलो होतो. आलोच आहे तर भेटावं म्हणून तिथे साप्ताहिक सकाळमधे काम करणाऱ्या मित्राला फोन लावला. त्याने कार्यालयातच बोलावून घेतले. मी गेलो तर तिथे वर्धापनदिनाची जय्यत तयारी करून ठेवलेली. त्याने उत्सुकतेने मला सगळे दाखवले. सोबत त्याच्या बॉसशी, ज्या की एक महिला आहेत, भेट घालून दिली. ओळख करून देताना म्हणाला हा लेखक आहे. याने एका महत्वाच्या विषयावर कादंबरी लिहिली आहे. त्या बाईंनी स्मित केलं. मला विचारलं फक्त कादंबरीच लिहिता की हलकं-फुलकं काही लिहिता. मी नाही म्हणालो. त्यांना वाटलं मी अधिक काही बोलेन कादंबरीबद्दल कारण त्यांच्या बरोबर माझ्या मित्राचे अजून दोन सहकारी होते. मी नेहमीप्रमाणे चहा पिता-पिता काहीच बोल...