युद्ध जिवांचे : मानवाची निर्जंतुक न होणारी चिंता.
...पण इतिहासाचा आधार घ्यायचा, तर तशी ती
नव्हती, असं छातीठोकपणे सांगता येणार नाही, हे नक्की आणि हा मुद्दा फक्त स्वाईन फ्लू
किंवा बर्ड फ्लू यांच्यापुरताच मर्यादित नाही. आपल्या औषधांच्या नमुन्यासाठी
जाणूनबुजून किंवा अगदी क्वचित अहेतुकपणे अनेकदा तिसऱ्या जगातल्या जनतेचा वापर
झालाय, हे असं होतच असतं.
मोठ्या माशांची भूक भागवणं हेच छोट्या माशांचं
प्राक्तन असतं, असं जंगलाचा कायदा असतो.
म्हणजे आपण आधुनिक वगैरे युगात जंगलाच्याच
कायद्यानं जगतोय की काय?
या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं शोधायचं.
सापडलं, ते इतरांना सांगण्यासाठी धीर गोळा करायचा.
आणि नाहीच जमलं, तर हे पुस्तक बंद करून
डोक्यातली खदखद बाहेर पडू नये, यासाठी डोळे मिटून पडून राहायचं, असहाय्य
शांतपणे!... –- सर्वे जन्तु निरामयाः
या पुस्तकाची सांगता वरील उपसंहार असणाऱ्या प्रकरणातील
शेवटच्या परिच्छेदाने होते. मानवी समूहाची काळजी ज्या पद्धतीने गिरीश कुबेर व्यक्त
करतात ती खचितच मराठीत एखाद्या पुस्तकात आली आहे. खासकरून आणि नाहीच जमलं, तर
हे पुस्तक बंद करून डोक्यातली खदखद बाहेर पडू नये, यासाठी डोळे मिटून पडून
राहायचं, असहाय्य शांतपणे!... या वाक्यातून आलेली आपली अगतिकता आणि असहाय्यता
तर अधिकच अंतर्मुख करायला लावते. मानवाने आजपर्यंत काय केले याचा आढावा या पुस्तकातून
घेतला जातो पण त्याचा रोख मानवाने आतापर्यंत वापरलेल्या आणि वापरल्या जाणाऱ्या
जैविक व रासायनिक अस्त्रांचा वापर या संकल्पनेतून.
गिरीश कुबेरांची या आधी हा तेल नावाचा इतिहास आहे व एका
तेलियाने ही दोन पुस्तके वाचलेली. साधारण दीड-दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १८५०
च्या मध्यात क्रूड ऑईल नावाचा चिकट, ओंगळवाणा पदार्थ सापडायला लागला. अमेरिकेतल्या
व्यापारी मानसिकता असणाऱ्या माणसाने त्याचे व्यावसायिक गुण लगेच ओळखले. तसेच
विज्ञानात तेव्हा नवनवीन गोष्टींची भर पडायला लागली तसे क्रूड ऑईलचं पृथक्करण करून
त्यातनं असंख्य जीवनोपयोगी पदार्थ वेगळे करता येतात हे सुद्धा दिसून आलं. त्या अनुषंगाने
असंख्य गाड्या पेट्रोल, डिझेलवर चालवता येतात यासाठी इंजिन्स विकसित करण्यात
आल्या. विमाने आणि रणगाडे यांचा शोध युद्ध करण्यासाठी लागला. त्यात क्रूड ऑईलचा
मुक्त हस्ताने वापर होऊ लागला. कुबेर मग त्या पाठीमागचं राजकारण व त्या अनुषंगाने
बदललेली जगाची गणितं साध्या सोप्या भाषेत सांगतात.
उदा. पहिलं महायुद्ध कशाने सुरुवात
झालं हे शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात शिकवलेल्या कारणापेक्षा पटणारं आणि मन विषण्ण
करणारं कारण देतात तेव्हा हादरायला होतं. कारण काय होतं तर युरोपातल्या दोन
बँकांच्या व्यवहारात झालेल्या बेबनावामुळे एका मिलिटरी नौकेला जलसमाधी घ्यावी
लागते. हे जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेला माहिती तरीही तिथल्या
राज्यकर्त्यांनी व धनाढ्य व्यापाऱ्यांनी युद्ध होऊ दिलं का तर जो क्रूड ऑईलवर
वर्चस्व प्रस्थापित करेल तो जगावर राज्य करेल या साध्या गणिताने. हे कारण
कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात दिलं जात नसावं. एका नौकेची जलसमाधी ही तशी
नेहमीचीच बाब पण त्या पाठीमागील राजकारण समजून घेतलं की एकूण मानवाची वर्चस्ववादी
वृत्ती कुठल्या थराला जाते हे कळल्यावर आपल्या वैचारिक कम्फर्ट झोनला तडा जातो.
कुबेर मग एका मागून एक घटना, प्रसंगांची मालिका व त्या मागील नेमके अर्थ सोप्या
भाषेत कोणताही बडेजाव न करता सांगतात तेव्हा आपण जमिनीवर यायला लागतो. आपण समजत
असलेला सनावळ्यांचा इतिहास किती गलिच्छ व हीन पातळी गाठलेला आहे हे सत्य पचत नाही.
असंच अजून एक असत्य कल्पित वाटावं असं सत्य युद्ध
जिवांचे या पुस्तकातून वरील दोन पुस्तकांच्या लेखन शैलीत कुबेर मांडतात. जैविक
व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास अशी टॅगलाईन एखाद्या चित्रपटाच्या
पोस्टरवर असणाऱ्या टॅगलाईनसारखी एकूण पुस्तकाच्या विषयाकडे व त्याच्या अपरिहार्य
गांभीर्यकडे निर्देश करते. निव्वळ टॅगलाईनसारखं ते न मिरवता जैविक व रासायनिक
अस्त्रांचा हजारो वर्षांपासूनचा इतिहास कसा रक्तरंजित आहे याचं कथन ते करतात.
जैविक अस्त्रांच्या वापरापूर्वी रासायनिक अस्त्र मानवाला ज्ञात होती. त्यांचा वापर
सढळ हाताने प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं या लाडक्या युक्तिवादाने न
करता केला जायचा. मानवाला आत्मरक्षण व शांती प्रस्थापित करण्यासाठी हिंसेचा वापर हा
दगडांच्या अस्त्रांचा शोध लागल्यापासून लागला. त्याचा वापर कोणत्याही तत्वज्ञानाचा
मुलाहिजा न मानता व वरतून हे करणं किती योग्य होतं याची भलामण करत आजपर्यंत करत
आला आहे.
आज विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती मानवाला कुठे नेऊ शकते
याची चुणूक या पुस्तकातून लागते. उदाहरणच द्यायचं झालं तर अमेरिकेने हिरोशिमामध्ये
अणूबॉम्बचा प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी केला ते तेथील जैविक व रासायनिक उत्पादनाचे
युनिट बंद करण्याच्या हेतूने. जपानी सरकार जे करत होते ते कुठल्या आंतरराष्ट्रीय कराराचा
भाग होता हे कळत नाही, अमेरिकेने अणूबॉम्बचा उपयोग करून त्यावर कळसाध्याय साधून
दुसऱ्या कुठल्या आंतरराष्ट्रीय कराराचा भंग केला हे समजत नाही. यात वरचढ कोण हे
ठरवणं अवघड ठरतं कारण जपान्यांनी त्या युनिटमधून तयार केलेले ग्लँडर्स या
जंतूंचा वापर चिनी लोकांवर फवारून केलं. ते अघोरी कृत्य झाकण्यासाठी अमेरिकेने
त्याहून अघोरी कृत्य केले. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर जपान विना अट शरण आला आणि
त्याला कुठल्याही आरोपाखाली आंतरराष्ट्रीय न्यायालातल्या खटल्यातून मुक्त केले जाते
का तर त्यांनी आतापर्यंत जैविक व रासायनिक प्रयोगांचं सर्वच्या सर्व संशोधन अमेरिकेला
देऊन टाकतात म्हणून. पुढे या आयत्या मिळालेल्या ज्ञानाचा यथायोग्य वापर अमेरिका
करतो का तर तो पर्यंत त्याला आपण जगात महासत्ता होणार याचा प्रकाश दिसलेला असतो.
पुस्तक वाचल्यावर कंटेजिअन सिनेमा आठवला. सिनेमातील
वेगवेगळ्या देशात होणारा एका अज्ञात रोगाचा प्रसार व त्यामुळे मानवाची जातच नष्ट
होण्याची काल्पनिक कथा प्रभावी वाटली होती. पुस्तक वाचल्यावर सत्य/वास्तव हे
कल्पिताहून भयंकर असतं असं जे म्हणतात ते सत्य आहे हे पटवून घ्यावं लागतं.




Comments