तलवार : वास्तववादी केस स्टडी
लातूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या बाहेरील
दर्शनी बाजूस एक भित्तीचित्र आहे. न्यायदेवतेचं. एका चित्रकारानं काढलेलं. वरतून
खालपर्यंत. न्यायदेवता एक स्त्री आहे. तिच्या डाव्या हातात तराजू आहे. उजव्या
हातात तलवार आहे. तिने डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. पण हे चित्र नेहमीच्या शैलीत
नाही तर कलात्मक दृष्ट्या आधुनिक प्रकारात मोडेल असं बनवलेलं आहे. सिनेमात न्यायदेवता
तिच्या वेगळ्या संदर्भासह येते तेव्हा अपरिहार्यपणे त्या चित्राची आठवण झाली.
कानून के हात लंबे होते है, कानून के शिकंजे में फसे तो
उससे बाहर निकलना मुश्कील होता है किंवा ये हात नहीं फांसी का फंदा है गब्बर सारखे
हिंदी सिनेमातच शोभून दिसणारे संवाद, त्यासोबत कानूनने पर्यायाने पोलिसांची तपास
यंत्रणा सुद्धा बऱ्याच सिनेमात बघितली आहे. ती किती खोटी व वास्तवापासून दूर
असायची हे सुद्धा बऱ्याचदा चर्चिल गेलं. या पार्श्वभूमीवर तलवार वेगळा ठरतो.
सीडीआय (सेन्ट्रल डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टेगेशन) च्या
वार्षिक समारंभात आश्विन कुमारला (इरफान खान) एक डबल मर्डर केस सोपवली जाते.
दिल्लीतल्या नोएडा परिसरात दंतवैद्य डॉ. रमेश टंडन (नीरज कबी) आणि नूतन टंडन (कोंकणा
सेन-शर्मा) यांची चौदा वर्षांची मुलगी श्रुती टंडन (आयेशा परवीन) हिचा राहत्या
घरात गळा चिरून खून झालेला असतो. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत तिचा खून टंडन दाम्पत्याने
केलेला असतो असा निष्कर्ष काढला जातो. तसेच गच्चीवर त्यांच्या नोकराचं शव तसाच गळा
चिरलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे तो खून सुद्धा यांनी केला आहे असं पोलीस तपासणी
अहवालात नमूद करून त्यांना गजाआड केलं जातं. पण मेडियाच्या आणि जनमताच्या
रेट्यामुळे ही केस सीडीआयकडे द्यायचं ठरतं. आश्विन कुमार टंडनच्या घरी पोचतो.
चौकशीचा फेरा चालू होतो. परत परत घराची आणि साक्षीदारांच्या जबानी घेतल्या जातात.
प्रत्येक जबानीत वेगवेगळे पैलू समोर यायला लागतात. आश्विन कुमारचं काम अवघड
व्हायला लागतं.
सिनेमाची सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर ती पटकथा. जवळ
जवळ निर्दोष असणारी पटकथा विशाल भारद्वाजने लिहिली आहे. त्यांनी किती मेहनत घेतली
असेल याची चुणूक प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते. छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा
विचार व तिचा काळाला पुढे मागे करत कथानक उभं करायचं कसब तर व्यावसायिक हिंदी सिनेमात कधी बघितल्याचं आठवत नाही. तेही केवळ अडीच तासांच्या वेळात बसवायचं
म्हणजे अद्वितीयच. अशा पद्धतीचं काम हॉलीवूडमध्ये नित्यानं दिसणारं. ही पटकथा
वस्तुपाठ ठरावी. सिनेअभ्यासकांनी व नवीन लोकांनी आवर्जून याची पारायणं करावी. या
पूर्वी एक थी डायन, ईश्कीयाचे दोन्ही भाग यात त्याचा पटकथाकार म्हणून सहभाग होता.
पैकी एक थी डायनची पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी होती. त्यातील चेटकीण या
प्रकाराला भयपटाच्या चौकटीत बसवून वैज्ञानिक आधार लावून प्रभावीपणे लिहिलं होतं.
शेवट सोडला तर बाकी बोलायला जागी नव्हती.
तरीही इथे एक दोष आहे. सिनेमाचा रोख आहे भारतीय तपास
यंत्रणेतल्या त्रुटी दाखवण्यावर. सिनेमा संपूर्ण त्या दृष्टीकोनातून दिसतो. ज्या
आरुषी तलवार मर्डर केसवर आधारित आहे त्यातील तलवार कुटुंबांच्या दृष्टीकोनाला महत्व
दिलं जात नाही तर तपास यंत्रणा सदोष असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय असं याचं
स्वरूप राहतं. या प्रकरणाला दुसरी एक बाजू आहे जी नोकराच्या कृत्याला समोर आणते.
सिनेमात हा कोन सुद्धा एक थिअरी म्हणून विचारात घेतला जातो.
पण प्रत्यक्षात तलवार
केसमध्ये त्यांनी मुलीसहीत नोकराला मारलं हे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यावर न्यायालयाने
शिक्षा सुनावली होती. विशाल भारद्वाज-मेघना गुलजार घडलेल्या घटनेला एका चौकटीत
ठेवल्यावर त्यांच्या आकलनानुसार वेगवेगळ्या शक्यता तपासायला लागतात. आपली तपास यंत्रणा
सदोष आहे या निष्कर्षाला आल्यावर त्यानुसार सिनेमाची रचना करतात. न्याय व्यवस्था
तपास यंत्रणेला प्रमाण मानून न्याय द्यायचं काम करते. त्यामुळे निर्दोष आणि
निपक्षपाती तपास यंत्रणा असेल तर सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही असं
पटकथाकार-दिग्दर्शक सांगायचा प्रयत्न करतात.
विशालचं जितकं कौतुक आहे तितकच कौतुक मेघना गुलजारचं आहे.
अशी पटकथा लिहिली तरी ती पडद्यावर यथायोग्यपणे उभी करणे हर्क्युलिअन टास्क असतं.
मेघनाने सिनेमॅटोग्राफर पंकज कुमारच्या साथीने ते काम उत्तमरित्या पार पाडली आहे.
विषयातील त्रयस्थता नेमकेपणे प्रेक्षकांसमोर ठेवते. अशी त्रयस्थता पथेर
पांचालीमध्ये रेंनी सुब्रता मित्रांच्या साथीने गाठली होती. त्यामुळे सर्व बाजू
बघितल्यावर प्रेक्षक विचारात पडतो. हे याचं यशच म्हणायला हवं.
सिनेमाची सध्या राशोमान सोबत जी अनावश्यक तुलना चालू आहे ती
योग्य नाही. याची तुलनाच करायची तर कोर्ट सिनेमाशी होईल. कोर्टमध्ये भारतीय न्यायालय पर्यायाने कायद्यातील दोष हा मुख्य विषय होता. इथे त्याच्याच प्राथमिक बाजूचा तपास यंत्रणेचा व त्यातील
दोष हा विषय आहे. त्यामुळे दोन्ही मिळून एक मोठ्ठं चित्र तयार होतं जे समकालीन भारतीय
समाजाचं उभा छेद घेऊन प्रेक्षकांसमोर असंख्य प्रश्न उभे करतं.






Comments