ख्वाडा : वस्तुस्थितीनिदर्शक

ढोबळ अर्थाने सिनेमाचे दोन भाग पडतात. व्यावसायिक सिनेमा आणि वास्तववादी सिनेमा. व्यावसायिक सिनेमाचे काही ठोकताळे असतात. त्यात कथा-कथानक यांचा निश्चित आलेख असतो. त्या आलेखात बऱ्याच गोष्टींचा भरणा असतो जसे नायक-नायिकेचे प्रेम, त्यांचे रुसवेफुगवे, गाणी, धिंगामस्ती, विनोदाची रेलचेल, खलनायक, त्याचे कारनामे आणि शेवटी हाणामारीनंतर हॅपी एंडिंग. वास्तववादी सिनेमात कथेपेक्षा आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून एका सुरुवात ते शेवट असं असणाऱ्या कथानकाची निवड केलेली असते. त्यात प्रेक्षकांवर प्रभाव पाडावा म्हणून मुद्दाम सिनेमॅटिक तंत्रांचा वापर केला जात नाही. आपल्याला काय सांगायचं आहे ते तो जास्तीत जास्त प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच तो वास्तववादी होतो. त्यातील पात्रे जिवंत व्यक्ती होतात. सिनेमाच्या तंत्राचा वापर कमी प्रमाणात करून जगणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य कसे आहे, त्याला किती अडथळे सहन करायला लागतात, ते त्यावर मात करतात का अशा प्रश्नांचा विचार केलेला असतो. मनोरंजन हे या सिनेमाचे सूत्र नसते तर आयुष्याचा/जीवनाचा घेतलेला मागोवा हा उद्देश असतो. ख्वाडा हा अशाच सूत्राचा सिनेमॅटिक आविष्कार आहे.

रघु (शशांक शेंडे) हा धनगर कुटुंबाचा प्रमुख आपले कुटुंब आणि उपजीविकेचे साधन असणाऱ्या शेळ्या-मेंढ्या घेऊन त्याची राहती जमीन आणि गाव सोडून त्यांना चरण्यासाठी पर्यायाने स्वतःला जगवण्यासाठी निघाला आहे. त्याची जमीन सरकारने हडप केली आहे का तर तिथे त्याने तिचा वापर फक्त शेळ्या-मेंढ्या जगवण्यासाठी केला आहे म्हणून. त्यामुळे ती जमीन वनीकरणासाठी योग्य आहे असं ठरवून त्याच्याकडून जप्त केली जाते. उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे आहे त्या गोष्टी गोळा करून रघु निघाला आहे. त्याने कोर्टात केस दाखल करूनही दहा वर्ष झालीत. त्याची बायको (सुरेखा) व दोन मुले बालू (भाऊसाहेब शिंदे) व पांडा (प्रशांत इंगळे) त्याच्यासोबत आहेत. त्यातच एकदा अशोक दादा पाटील (अनिल नगरकर) हा सरपंच मटणाच्या पार्टीसाठी त्याच्याकडून एक बोकड घेऊन जातो तेही पुरेसे पैसे न देता. बालू गावातल्या जत्रेत अशोकच्या पठ्ठ्याला कुस्तीत हरवतो. त्यामुळे तो चिडून याचा बदला कसा घ्यायचा याच्या विचारात असतो आणि एके दिवशी आपसूक बालू त्याच्या जाळ्यात अडकतो.

ख्वाडा नावातूनच लेखक-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे एकूण सिनेमाचा पोत कसा असेल ते सूचित करतात. ख्वाडा म्हणजे अडथळा. अडथळा मग तो कशाचा का असेना. इथे सरकारी निर्णयामुळे जगण्याला ख्वाडा घातला गेला. पुढे सरपंचाच्या रूपाने सामाजिक ख्वाडा घातला गेला. तसेच जी जमीन विकत घ्यायची ती सोयरिक जमवलेल्या पाहुण्यानेच नकळतपणे घ्यावी ज्यामुळे बालू जमीन घेऊन सेटल होऊयात म्हणण्याला ख्वाडा बसतो. इथे अडथळा हा अडचणीच्या रुपात येतो. बालूने अशोकच्या पठ्ठ्याला त्याच्याच तालमीत हरवणे हे पुढच्या संघर्षाची नांदी ठरते पण एकूणच आयुष्याचा प्रश्न उभा करून. कथा-पटकथाकार भाऊराव कऱ्हाडे एका नंतर एक अडचणींची मालिकाच या कुटुंबाच्या साक्षीने दाखवायला लागतात तेव्हा भारतीय समाजाचं हे प्रातिनिधिक चित्रण नेहमीच्या व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत बसत नाही.

सिनेमा वास्तववादी ठरतो तो त्याचा उत्तम अभ्यास केल्याने. कऱ्हाडेंनी एका धनगर कुटुंबाच्या सोबत काही महिने घालवून त्यांची भाषा, चालीरीती, पेहराव, लग्नाच्या विधी, जातीतल्या इतरांशी असणारी बांधिलकी यांचा जवळून अभ्यास केला. निरीक्षणं केली. चांगलं फिल्ड वर्क केल्यावर त्यांनी आजच्या परिस्थितीत एका धनगर कुटुंबाची होणारी ससेहोलपट यथातथ्यपणे उभी केली. ते पडद्यावर सुरुवातीपासून स्पष्टपणे दिसून येते. पण एकूण कथेचा आवाका कुठल्याही दक्षिणात्य सिनेमाच्या कथेसारखा असल्यामुळे पहिल्यांदा हा नेहमीचा सिनेमा वाटण्याची शक्यता जास्त आहे. कऱ्हाडे या कथावस्तूकडे वास्तववादी दृष्टीकोनातून बघत असल्यामुळे आपण आयुष्याच्या किती जवळ जाऊ शकतो याचा विचार प्रसंगांच्या चित्रीकरणात करतात.

उदा. एका प्रसंगात रघु सर्व शेळ्या-मेंढ्या उचलून नेणाऱ्या अशोकदादाकडे माफी मागायला जातो तेव्हा तो गावातल्या पारावर आपल्या मित्रांसोबत राजाच्या थाटात बसलेला असतो. रघु गुडघ्यावर बसून त्याची माफी मागतो. तो दाद देत नाही म्हटल्यावर त्याचे पाय धरायला जातो तेव्हा तो त्याला लाथाडतो. इथे कऱ्हाडे सरळ वाईड अँगल शॉटमध्ये दाखवतात. तसेच लगेच अशोक दादाच्या वाक्याचा क्लोज अप वापरतात. व्यावसायिक सिनेमात हा प्रसंग त्याच्या लाथ मारण्यावर फोकस करून तीन-चार वेळा रिपीट करून दाखवला गेला असता. जणू हे दर्शवण्यासाठी की त्या पात्रावर किती अन्याय झाला आहे. संकलनात असं दाखवायची सुविधा असली तरी कऱ्हाडे प्रसंगाकडे गांभीर्याने बघतात त्यामुळे प्रसंग अस्वस्थ करतो. अशाच पद्धतीने संपूर्ण सिनेमा कऱ्हाडे प्रेक्षकांसमोर ठेवतात.

शशांक शेंडे व अनिल नगरकर सोडले तर इतर सर्व कलाकार हे अननुभवी पण त्यांचं काम या दोघांच्या तोडीस तोड. मात्र या सिनेमाचे खरे हिरो दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आहेत. त्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करत बनवलेला हा सिनेमा फँड्रीकोर्ट अशा उत्तम वास्तववादी सिनेमांच्या पंक्तीत बसतो. वास्तववादी सिनेमांचा एक प्रवाह मराठीत चालू झाला आहे त्याचं स्वागत. 

Comments