राजवाडे अॅण्ड सन्स : वर्तमानकालीन पुण्याचा तुकडा

मराठी सिनेमात शहराला केंद्रस्थानी ठेवून कथानक दाखवणारे सिनेमे तसे कमीच आहेत किंवा नाहीतच म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगराची कहाणी सांगणारे हिंदी सिनेमे बनवले असले तरी तिच्या अंतरंगात शिरून त्यातील वृत्ती-प्रवृत्तीवर प्रहार करणारे किंवा तिची रोमँटिक बाजू दाखवणारे असंख्य येत असतात किंवा आहेत. पण इतर शहरांना त्यांचं व्यक्तिमत्व असतं. त्यांचा इतिहास असतो. तिथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्याचा आयाम वेगळा असतो. काही गोष्टी सर्वत्र सारख्याच असतात उदा. कोलगेट पेस्ट. तरीही त्या ठिकाणचं स्थान माहात्म्य असतं ते त्या त्या ठिकाणालाच लागू होतं. उदा. पुणे शहर. पुणे शहराबद्दल खूप काही सांगावं लागू नये इतकं ते मराठी/भारतीय भावविश्वाशी जोडलं गेलं आहे. कधी जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट होण्याच्या तर कधी भांडारकर संस्थेवरच्या हल्ल्याने किंवा कधी ते अतिरेक्यांचं स्लीपर सेल असण्याच्या कारणाने किंवा सांस्कृतिक राजधानी असं बिरुदावली मिरवण्याच्या किंवा ऐतिहासिक काळापासून महत्वाच्या असंख्य घटनांचा साक्षीदार असण्याच्या निमित्ताने. सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अॅण्ड सन्स हा सिनेमा वर्तमानकालीन पुण्याच्या तुकडा म्हणून प्रातिनिधिक स्वरुपात एका एकत्र कुटुंबाच्या परिप्रेक्षात समजून घ्यायचा प्रयत्न करतो.

रमेश राजवाडे (सतीश आळेकर) हे राजवाडे अॅण्ड सन्स या सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोठे व्यावसायिक. पुण्यातलं बडं प्रस्थ. ते त्यांची पत्नी (ज्योती सुभाष) आणि त्यांची तीन मुले विद्याधर (सचिन खेडेकर), शुभांकर (अतुल कुलकर्णी) व लक्ष्मी (मृणाल कुलकर्णी) आणि तिचा पती वैभव जोशी (राहुल मेहेंदळे) यांच्यासोबत एकत्र एका टोलेजंग श्रीमंत अपार्टमेंटमध्ये राहतायत. त्यांची नातवंडं विराजस (सिद्धार्थ मेनन), अनय (अलोक राजवाडे), श्वेता (कृतिका देव), अनन्या (मृण्मयी गोडबोले) व तन्मया (सुहानी धडफळे) जी त्यांच्या मनमानी वागण्याला कंटाळली आहेत. आपापल्या परीने याच्या विरोधात कसं उभं राहायचं याचा विचार करतायत. त्यांचा जुना वाडा पाडून तिथे सर्वांसाठी मोठं अपार्टमेंट बनवायचा प्लान रमेश राजवाडेंचा असतो. त्यांना कुटुंब कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहणं गरजेचं वाटत असतं. पण देव हलवण्याच्या दिवशी वाड्यात एका इसमाचं आगमन होतं. तो विक्रम राजवाडे (अमित्रियान पाटील) असतो. कॉलेजात असताना तो घरातून पळून गेलेला असतो. त्याच्या आगमनाने राजवाडे नातवंडं खुश होतात. ही ख़ुशी त्याच्या वागण्याने त्यांच्यात होणाऱ्या बदलाची नांदी ठरते.

सचिन कुंडलकरचा सिनेमा हा पात्रांचा असतो. ती त्रिमितीत घडवलेली असतात. कथानक नावाला म्हणजे सुरुवात/मध्य/शेवट असावा असा अलिखित नियम आहे म्हणून असते. सचिनना पात्रांच्या जगण्याचा अवकाश पकडायचा असतो. त्यामुळे त्यांच्या सिनेमात घडत काहीच नसलं तरी लेखनातून स्वच्छपणे उतरलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे ताणेबाणे, तत्वज्ञान, त्यांचा आयुष्याकडे दृष्टीकोन, भूतकाळाशी असणारं नातं, बरंच काही सुटत, निसटत चालल्याची भावना उत्तमपणे साकारलेलं असतं. सचिन ज्या पुणे आणि आसपासच्या परिसरात वाढले, मोठे झाले तिथली माणसे त्यांना सिनेमाच्या चौकटीत आणावीशी वाटतात. त्यासाठी ते इतर सर्व गोष्टींना फाटा देऊन त्या व्यक्तिरेखांच्या आंतरसंबंधाला महत्व देतात. इथे सुद्धा कथानक एका मोठ्या व्यापारी कुटुंबाची कथा असली तरी त्यांच्या बिझनेसची तोंड ओळख गरजेनुसार करून देण्यात येते. ती सुद्धा दिली नसती तरी चाललं असतं इतकी बिनमहत्वाची ठरते. ही सर्व वैशिष्टे त्यांच्या पहिल्या सिनेमात रेस्टॉरंटमध्ये पण दिसली होती. अय्या या हिंदी सिनेमाचा अपवाद वगळता त्यांचे सिनेमे हे उत्तम लिहिलेल्या व्यक्तीरेखांभोवती रचलेले असतात. त्यामुळे त्याला व्यक्तिगत टच असतो जो इथे सुद्धा बघायला मिळतो.

थोड्या महिन्यांपूर्वी झोया अख्तर दिग्दर्शित दिल धडकने दो सिनेमा आला होता. त्यात सुद्धा एका श्रीमंत पंजाबी कुटुंबाची कहाणी होती. पण कथेला निश्चित असा कळसाध्याय होता ज्यामुळे त्यात घटना, प्रसंग होते. इथे कळसाध्यायापेक्षा व्यक्तिरेखांच्या मानसिकतेत होणारा बदल दर्शवण्यावर दिग्दर्शकाचा भर आहे. तिथे कथेला व त्यातील बदलांना पात्रांच्या मानसिकतेबरोबर जोडलेलं होतं. त्यामुळे सकृतदर्शनी दोन्ही सिनेमे सारखे वाटत असले तरी दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनाला यात महत्व येतं. सचिनचा परिप्रेक्ष पुण्यातून येणारा आहे. कदाचित पुण्याबाहेर हे कथानक तितकं प्रभावी ठरणार नाही. त्यामुळेच काळासोबत एका वाड्याचे व त्यातील व्यक्तींचे एका टोलेजंग इमारतीत रुपांतरीत होऊन स्वतःच्या कोशातून बाहेर पडून बदलांना सामोरे जाणे दिग्दर्शकाला अपेक्षित आहे. जे दिल धडकने दोमध्ये होत नाही. तिथे विसंवाद सुसंवादात बदलावा हे दिग्दर्शकाला अपेक्षित.

दिग्दर्शकाचा सुस्पष्ट दृष्टीकोन असणारे सिनेमे मराठीत कमीच आहे. त्यातही स्वतःची मुल्यदृष्टी असणारे व त्या मुल्यदृष्टीला न्याय देणारे दिग्दर्शक दुर्मिळच. त्यामुळे सचिन कुंडलकरचा सिनेमा हा प्रेक्षकांकरिता निश्चिंत करणारा असतो. सचिन आपली दिशाभूल करणार नाहीत ही खात्री ते बाळगून असतात. हेच त्यांचं वेगळेपण ठरतं. 

Comments