शानदार : घड्याळ पहायला लावणारा

विकास बहल आणि कंगना राणावतचा मागच्या वर्षी क्वीन आला तेव्हा दिग्दर्शक म्हणून विकास बहलची ओळख चिल्लर पार्टी नावाच्या लहान मुलांच्या सिनेमाच्या दोन दिग्दर्शकांपैकी एक अशी झालेली. त्या आधी निर्माता म्हणून त्याने असंख्य सिनेमांची निर्मिती केलेली. चिल्लर पार्टीचं चिक्कार कौतुक झालं सोबत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात वर्णी पण लागली. क्वीनच्या आधी फॅशनमधील भूमिकेसाठी तिचं कौतुक तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पण यशस्वी अभिनेत्री म्हणून काही ती प्रभावी नव्हती. सिनेमा चालण्या इतपत ती प्रेक्षक खेचू शकत नाही तसेच तिच्या भूमिकेत वैविध्य नाही असा आरोप होत होता. क्वीनने मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवला. अभिनेत्रीच्या जीवावर सिनेमे हिट करता येतात हा संदेश गेला तसेच एक दिग्दर्शक म्हणून विकास बहलची स्वतंत्र ओळख तयार झाली. अनपेक्षित यश मिळाल्यामुळे त्याच्या पुढील सिनेमाची उत्सुकता वाढलेली.

शानदारची सुरुवात कथाबाह्य निवेदनाने होते. कुणी विपीन (पंकज कपूर) एका छोट्या मुलीला आलियाला (आलिया भट) त्याच्या अलिशान घरी घेऊन येतो. ती अनाथ असते असं तो म्हणतो. त्याची आई (सुषमा सेठ) व वर्तमानकालीन पत्नी (निक्की अनेजा वालिया) तिला घरात घ्यायला सख्त नकार देतात तरीही तो तिला घरी ठेवतोच. त्याची मुलगी ईशा (सनाह कपूर) मात्र तिच्यावर बेहद्द खुश असते. पण आलियाला इनसोम्निया असतो. ती रात्रभर झोपू शकत नसते त्यामुळे एकतर ती वाचत बसत असते किंवा तिचे मुह बोले पिताश्री तिला दररोज एक स्वप्न देत असतात जेणेकरून तिला शांत झोप यावी. पण त्याने प्रश्न सुटणार नसतो. विपीनला वाटतं तिला समजून घेणारा, तिची काळजी वाहणारा कुणी आला तर ती शांतपणे झोपी जाईल. जगजींदर जोगिंदर (शाहीद कपूर) हा लग्न सोहळ्यांचे आयोजन करणारा त्यांच्या घरी येतो अन् बघताच क्षणी आलियाच्या प्रेमात पडतो. ईशाचं लग्न ठरलेलं असतं एका फंडवानीच्या (संजय कपूर) पुतण्याबरोबर. लग्नापेक्षा मुलगी देऊन बिझनेस डील करायची विपीनच्या आईची इच्छा असते. जगजींदर जोगिंदर हा आलियासारखा इनसोम्नियाक असतो. त्यामुळे हे एकमेकांना कळल्यावर तो आणि ती जवळ यायला वेळ लागत नाही.

दिग्दर्शक विकास बहल-पटकथाकार अन्विता दत्त गुप्तन यांनी क्वीनच्या अनपेक्षित यशानंतर अजून मोठं व लॅव्हिश काहीतरी बनवूयात असं ठरवलेलं असावं. कथा बहल आणि चैताली परमारची आहे. त्याला पडद्यासाठी गुप्तननी लिहिलं आहे. मुळात कथेत नाविण्य नाही. क्वीन जसा एकाच वेळी चिकार हसवतो सोबत राणी मेहराच्या आयुष्याची होणारी वाताहत सुद्धा दाखवायला कचरत नाही तसं इथे होत नाही. इथे कथेत गांभीर्य आहे तसेच हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. पण त्यांची सांगड व्यवस्थित घालता आलेली नाही. दिग्दर्शक-पटकथाकार यांनी कथाबीजाकडे पुरेशा गांभीर्याने बघितलं नसावं किंवा असं असं सुचलं चला लगेच चित्रीकरण करूयात असा काहीसा हिशेब असावा. याचा परिणाम एक मितीत असणारी पात्रं, सदोष पटकथा, बाष्कळ ते बाळबोध विनोद, निश्चित कळसाध्याय नसणे, कथानकाला घटनांमधून वेग यायला हवा तो न येणे कारण घटना, प्रसंग नसणे या व अशा बऱ्याच त्रुटी राहिलेल्या आहेत. क्वीनच्या वेळी दिग्दर्शक-पटकथाकार यांच्यासमोर स्पष्ट कळसाध्याय असणारी कथा होती. ज्याला विशिष्ट सुरुवात आणि अचूक शेवट होता त्यामुळे त्यांना कुठे पोचायचं ते माहित होतं. इथे सुरुवात डळमळीत असल्यामुळे शेवट कुठे करायचं ते माहित नव्हतं त्यामुळे जिथे शेवट होतो तिथपर्यंत पोचता पोचता प्रेक्षक कंटाळण्याची शक्यता वाढते.

हा सिनेमाचा मोठाच दोष समजायला हवा. सिनेमाने काहीही दाखवलं तरी चालतं पण त्याने घड्याळ बघायला लावू नये. प्रेक्षक घड्याळ बघायला लागला की समजायचं त्याला थिएटर बाहेरच्या गोष्टी आठवयाला लागल्यात. दोन तास आपल्या आयुष्याचे आपण सिनेमावाल्यांना देतो याचा अर्थ त्याने प्रापंचिक गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवायला हवे ही रास्त आणि तिकिटाला मोजलेल्या पैशांची अपेक्षा असते. ही अपेक्षा जर सिनेमा पूर्ण करत नसेल तर सिनेमा बनवणाऱ्यानी ते लक्षात घ्यायला हवं. शानदारच्या बाबतीत हा प्राथमिक धडा सोयीस्करपणे विसरला जातो किंवा क्वीनच्या यशामुळे आपण त्याची पुनरावृत्ती करू असा अंदाज असावा. दुर्दैवाने यात तरी तसे दिसून येत नाही.

या आधी विकी डोनरच्या यशानंतर दिग्दर्शक शुजित सरकार आणि पटकथाकार जुही चतुर्वेदी यांनी मद्रास कॅफेमध्ये असा प्रयत्न केला होता पण तो तितकासा प्रभावी ठरला नव्हता. तिथे पण कौटुंबिक कहाणीच्या पलीकडे राजकीय-युद्धपट द्यायचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला नाही. परत जेव्हा ती दोघं पिकुमध्ये एकत्र आली तेव्हा ते समीकरण जुळून आलं. दिग्दर्शक-पटकथाकाराने संकल्पना-कथेचा विचार करताना आपल्या मर्यादा सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात नाही तर अतिआत्मविश्वासापायी प्रोजेक्ट सदोष राहण्याचीच शक्यता अधिक असते. डेव्हिड धवनची कारकीर्द याचं उत्तम उदाहरण ठरावं. सुरुवातीच्या काही सिनेमात गंभीर आशय मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या धवनला आपण विनोदी सिनेमेच चांगल्या पद्धतीने बनवू शकतो हे जेव्हा कळलं तेव्हापासून त्याने त्याची कास कधी सोडली नाही. विकास बहलनी पुढील सिनेमाच्या वेळी आपल्या मर्यादांचा विचार सुद्धा करावा ही अपेक्षा. 

Comments