जॅकी चॅन आणि मी

जॅकी चॅन माझ्या आयुष्यात कधी आला ते नेमकं आठवत नाही पण माझ्या वडिलांना एका आतेभावाला तो प्रचंड आवडायचा. लातुरात तेव्हा उषाकिरण, रत्नदीपसारखे थिएटर्स फक्त याचेच सिनेमे दाखवायचे किंवा हाँगकाँगचे कुंग-फू कराटेचे सिनेमे दाखवायचे. जॅकी चॅनसोबत सॅमो हंग, युआन बियू, मिशेल यो या ईतर अॅक्शन जॉनराला वाहिलेल्या नटनटींचे सिनेमे यायचे पण सटीसामाटी.

जॅकी चॅन मात्र त्या दोघांना खूप आवडायचा. ते दोघं चित्रपट आला की आवर्जून बघायला जायचे. मला आठवतय मी त्याचा पहिला चित्रपट बघितला तो प्रोजेक्ट भाग दोन. हा चित्रपट प्रोजेक्ट चा सिक्वल होता परंतु फक्त कथानायक जॅकी चॅन सोडला तर ईतर महत्त्वाचे कलाकार युआन बियू सॅमो हंग नव्हते. तरीपण तो लक्षात राहिला त्यातल्या अॅक्शन प्रसंगांसाठीत्यात शेवटाकडे एक प्रसंग आहे. जॅकीला पकडून एका मोठ्या कांडप यंत्रात ठेवले जाते अन् कांडप यंत्र चालू केलं जातं. कांडप यंत्रात जशी खाली मिरची ठेवली जाते अन् वरचा दट्टावजा भाग सारखा वरखाली होऊन मिरच्या ठेचतो तश्याच प्रकारे एक खूप मोठ्या आकाराचा गोल दट्टा हळूहळू खाली वर व्हायला लागतो. तो खोलगट भाग असल्यामुळे आजूबाजूला काहीही आधाराला नसल्यामुळे जॅकीला दट्टा खाली आला की त्याच्या समांतर रहायला लागतं. हा प्रसंग अत्यंत क्रूर आहे कारण आपला कथानायक अश्या प्रकारे ठेचला जाणार या काळजीने त्यावेळेस मला भीती वाटली होती. पडद्यावर दाखवलेल सर्व खरं असतं असं मानण्याचा तो काळ होता तरी पण आजही हा प्रसंग माझ्या मनाचा ठाव घेतो.

Project A II
हाच प्रसंग का! या आधीच्या प्रोजेक्ट मध्ये त्याने तीस फुटावरील घडयाळ्याच्या काट्यावरनं खाली उडी घेण्याचा प्रसंग आहे. त्यात त्याची मान मोडून काही दिवस रुग्णालयात काढावी लागली होती. या अश्या प्रकारच्या प्रसंगांनी किंवा घटनांनी त्याची संपूर्ण सिनेकारकीर्द गच्च भरलेली आहे.

खरंतर मी ज्या ऐंशीच्या दशकात व लातूरसारख्या छोट्या जिल्ह्याच्या छोट्या शहरात जन्मलो-वाढलो तिथे सिनेअभिनेते व राजकारणी यांचाच प्रभाव होता/आहे. याला कदाचित भौगोलिक कारणं असतील पण माझ्यासाठी ते फायद्याचं ठरलं. माझ्या बाल मनावर त्याच्या व्यक्तिमत्वाचा जबरदस्त प्रभाव पडला. त्याचं बोलणं, चालणं, त्याची छोट्या मूर्तीसारखी असणारी शरीरयष्टी, कराटेमधलं नैपुण्य, चित्रपटातल्या हाणामारीसाठी घेतली जाणारी स्टान्स, हाणामारीसारख्या गंभीर प्रसंगात शाबूत असलेली विनोदीवृत्ती अन् प्रेक्षकांना हसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगात शोधलेल्या जागा आज अचानक आठवयाला लागतात. बस किंवा रेल्वे प्रवासात तर हमखास असे प्रसंग डोळ्यांसमोर येतात.

Project A
त्याचा बालमनावर परिणाम झाला तरी प्रत्यक्षात त्याच्यासारखं हिरोगिरी करणं जमणार नव्हतं किंवा परवडणारं नव्हतं. मग एकच उपाय होता तो म्हणजे कराटे क्लास जॉईन करणे. त्यावेळी हे थोडं फॅडच होतं की मुलांना कराटेच्या क्लासला व मुलींना भरतनाट्यम किंवा कथकच्या. माझ्यासाठी ते स्वप्नवत होतं. दुसरं कारण म्हणजे वडिलांना त्यांची आवड व मुलानं अंगापिंडानं सुदृढ व्हावं ही इच्छा. मी अगदीच काडी पैलवान होतो. मला वाटतं आजही कराटे शिकण्याचा सोस याच कारणांमुळे अव्याहत चालू आहे. पण माझ्यासाठी हे शिकणं कायमचं मनावर कोरलं गेलं. कंटाळा आला की याचे नाहीतर जेट लीचे जुने सिनेमे यू-ट्युबवर बघतो.

कराटे शिकणं हा अत्युच्च आनंद होता. शाळा सुटल्यावर संध्याकाळी सहा ते आठमध्ये पारिजात मंगल कार्यालयात आठवड्याचे सहा दिवस क्लास भरायचा. के. राजू नावाचा दाक्षिणात्य माणूस शिकवायचा. क्लासचं नाव होतं कराटे इंडियन मार्शल आर्ट्स. आमच्याकडून दररोज वेगवेगळा व्यायाम आणि कराटेमधले डावपेच घोटवून घेतले जायचे. क्लास जॉईन केलं की विशिष्ट पद्धतीचा पोशाख दिला जातो जो एका पांढऱ्या रंगाच्या बेल्टनी बांधायचा असतो. ती सुरुवात असते कराटेच्या टप्प्यांना पार करायची. माझी प्रगती यलो बेल्ट परिधान करण्याइतपत झाली होती. म्हणजे फक्त दुसऱ्या टप्प्यापर्यंत. कराटेत ब्लॅक बेल्ट मिळवणे हे अंतिम ध्येय असतं थोडक्यात कराटेतला पदवीधर होणे. त्या पुढे डॅन हा प्रकार असतो थोडक्यात पदव्युत्तर पदवीधर होणे. त्यावेळी याचा इतका प्रभाव होता की वाटायचं के. राजूसारखं आपण यात करिअर करावं अन् देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर पारितोषिके मिळवायची. लहानपणी अशा प्रकारे विविध क्षेत्रात करिअर करायच्या साथी फार त्रास देतात. दिवा स्वप्ने बघायला लावणारी स्वप्ने असतात ती.

माझ्यावर कराटेनं वेगळाच परिणाम केला तो म्हणजे मी डॉन किहोतेप्रमाणे ज्या-त्या गोष्टीत आपल्यासमोर शत्रू उभा आहे असं समजायला लागलो. संध्याकाळी क्लास संपल्यावर घरी जाताना हा-हू करत जायचो तेव्हा अंधारात लांबवर असणारा एखादा लाईटचा खांब, झाडाची सावली तसेच गप्पा मारत थांबलेली माणसं ही कराटेच्या चित्रपटात दाखवतात तसे शत्रूच आहेत असं वाटायचं. त्यांना कसं डिफेंड करायचं/मारायचं/दोन हात करायचे हे स्वतःशी जुळवायचो किंवा सोबतच्या मित्रांना सांगायचो. क्लासमध्ये आपण सोडून जगात सर्व शत्रूच आहेत हे मनावर इतकं बिंबवलेलं असतं त्यामुळे वाटायचं आपणच या जगाचे तारणहार आहोत. क्लासला पोचेपर्यंत आणि वापस घरी जाताना आमच्या चर्चा एखाद्या माणसानं हल्ला केला किंवा वाटेत आडवा आला तर कुठल्या प्रकारे त्याला रोखायचा ह्या असायच्या. आम्ही शिकवलेल्या सर्व गोष्टींचा कसा उपयोग करायचा हाच विचार करायचो. एखाद्याने रागवलं किंवा कानफटात मारली की मनात विचार यायचा याला कुठल्या पद्धतीने ठोकायला पाहिजे: एखादा चॉप मारायचा की दोन्ही मांड्यात जोरदार किक मारायची. प्रत्यक्षात ते कधीच व्हायचं नाही. मनात भीती असायची आपण लहान असून याच्यासमोर आपला काय टिकाव लागणार. पण एका गोष्टीचा विचार मनात आला तो म्हणजे अश्या प्रकारचे संस्कार हातून वाईट गोष्ट करायला कारणीभूत ठरत असतील का? कारण बरीच मुलं नकळत याचा चुकीच्या पद्धतीने वापर करायची. ते आमच्यासारख्या काडी पैलवानांवर त्यांचा दांडगटपणा आजमावून बघायची. मी मात्र असं केल्याचं आठवत नाही पण नाही केलय असंही सांगता येत नाही.

मुळात कराटे हे स्व-संरक्षणासाठी आहे हे जरी सांगितलं गेलं असलं तरी त्या वेळच्या ठिसूळ मनावर ते उलट्या पद्धतीने उमटलेलं होतं. आज वय वाढल्यावर लक्षात येतं त्याचा उपयोग योग्य दिशेने केल्यास आयुष्य समृद्ध किंवा त्यातूनही करिअर करता येऊ शकतं पण मध्यमवर्गीय घरात वाढल्यामुळे नोकरी एके नोकरी अशी मानसिकता तयार झाल्यामुळे आणि रिस्क घेण्याची क्षमता नसल्यामुळे एका चांगल्या करिअरला आपण मुकलो असं वाटतं. माझ्या आयुष्यात अश्या कितीतरी गोष्टी घडल्यात किंवा मी केल्यात ज्यात मला वाटायचं यात उत्तम करिअर होऊ शकतं असा आत्मविश्वास होता. नुसता आत्मविश्वासच होता प्रत्यक्षात बऱ्याच गोष्टी अर्धवट सोडण्यातच मी धन्यता मानली.

कराटेमध्ये करिअर केलं नसलं तरी त्यातील मानवी शरीर मर्यादांना स्पर्श करण्याची हातोटी आजही मनाला भुरळ घालते. जॅकी चॅनच्या सिनेमात या शरीर मर्यादांना कथानकाद्वारे दाखवण्याचा छान प्रयत्न केला गेला. पण त्याची सुरुवात मात्र अॅक्शन सिनेमात न होता बाल कलाकार म्हणून एकोणीसशेसाठच्या सिनेमात झाली. घरची परिस्थिती बेतास बात असल्यामुळे आई-वडील ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाले. जॅकीला बीजिंगच्या पेकिंग ऑपेरा स्कूलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी त्याचे वय साधारण सहा-सात वर्षाचे होते. स्कूलमध्ये वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापर्यंत पारंपारिक चायनीज आर्ट्समध्ये मार्शल आर्ट्स आणि अक्रोबॅटिक, गाणे, पर्फोर्मिंग व अभिनय शिकवला गेला.

Dragons Forever
पेकिंग ऑपेरा स्कूलमधून बाहेर पडल्यावर त्याने परत सिनेमात काम करायला सुरुवात केली. स्कूलमधेच असताना त्याची सॅमो हंग, युआन बियू व इतर सहकलाकारांची ओळख झाली होती. जे पुढे जाऊन हाँगकाँग न्यू व्हेव सिनेमाचे सिंहाचा वाटा उचलणारे आधारस्तंभ बनले. त्यांनी एकूण सात सिनेमात एकत्र काम केले. त्यातील प्रोजेक्ट ए, व्हील्स ऑन मिल्स आणि ड्रॅगन्स फॉरेव्हर हे तीन सिनेमे महत्त्वाचे. १९७६च्या हँड ऑफ डेथमध्ये तरुण जॉन वूच्या दिग्दर्शनाखाली काम केल्यावर जॅकी ऑस्ट्रेलियाला गेला. दोन वर्षानंतर तो वापस आला आणि स्नेक इन इगल्स शॅडोमध्ये मध्यवर्ती भूमिका केली. याच सिनेमात जॅकीची शैली पहिल्यांदा पाहायला मिळाली. मारामारीच्या प्रसंगात विनोद वापरण्याची पद्धत त्याने इथूनच वापरत आणली. याचा फायदा लगेच दिसून आला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. त्याच वर्षी आलेल्या ड्रंकन मास्टरने बॉक्स ऑफिसचे तोपर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स तोडले.

अमेरिकेत बॅटल क्रीक ब्रॉल नावाच्या अयशस्वी सिनेमात काम केल्यावर जॅकी वापस हाँगकाँगला आला. पण तिथे हेरोल्ड लॉइड व बस्टर कीटनचे सिनेमे बघून आपण त्यांच्याप्रमाणे नियंत्रित मारामारी दाखवू शकतो असा आत्मविश्वास त्याला आला. याचा मोठ्या प्रमाणात उपयोग त्याने प्रोजेक्ट एमध्ये केला. या चित्रपटापर्यंतचे सिनेमे हे थोडेफार पोशाखी होते. जॅकीने खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर प्रभाव टाकला तो १९८५च्या पोलिस स्टोरी या सिनेमात. यात त्याने मारामारींना खास जॅकी चॅन टच दिला. अगदी हॉलीवूडने यातील एक प्रसंग जसाच्या तसा दोन सिनेमात वापरला. जॅकीने त्याच्या आत्मचरित्रात हा त्याचा उत्कृष्ट अॅक्शन सिनेमा आहे असं लिहून ठेवलय. पोलिस स्टोरीने त्याच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात केली जी त्याला हॉलीवूडमध्ये प्रस्थापित करण्यासाठी पुरेशी ठरली. १९९५चा रम्बल ईन द ब्रोंक्स व १९९८च्या रश अवरने संपूर्ण जगात त्याचे नाव आदराने घेतले जाऊ लागले.

याचा अर्थ असा नव्हे की तो श्रेष्ठ नट आहे किंवा त्याने अभिनयाची आतषबाजी करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलय. जेष्ठ चित्रपट समीक्षक गणेश मतकरींच्या शब्दात सांगायचं तर He is a good professional actor with a good skill-set of designing and performing elaborate action sequences and has a good sense of humor. But because of these abilities which have made him a star he is generally wasted in repetitive roles and his range is rarely tasted in any of the films. हे अगदी बरोबर आहे पण काही सिनेमात त्याने त्याची मार्शल आर्ट्सची कला बाजूला ठेऊन अभिनय करण्याचा प्रयत्न केला उदा. शिंजुकू इन्सिडेंट किंवा रॉब बी-हूडमध्ये पहिल्यांदा एका चोराची भूमिका साकारली पण हे अपवाद ठरले. तसेच वयानुसार त्याने इतर नटांसोबत काम करून स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. उदा. रश अवर आणि शांघाय नून.

मला मात्र त्याचा अभिनय तितका आवडत नाही. त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात अभिनयापेक्षा सवंग विनोदाचा केलेला वापर खटकतो. तसेच सदोष पटकथेवर काम केल्यामुळे चित्रपट बाळबोध पातळीवर उतरल्याची उदाहरणे आहेत. एकमितीत असणारी पात्रं हे एक त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. फक्त उत्तम अॅक्शन प्रसंग चित्रित करायचे या नादात पटकथेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. काही-काही सिनेमाच्या कथा तर हिंदी चित्रपटांसारख्या झाल्या आहेत. तरीही त्याने पोशाखी सिनेमात कामं केल्यामुळे सत्य विरुद्ध असत्य यांच्यातला झगडा कायम त्याच्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अगदी चायनीज झोडीयॅक हा शेवटच्या अॅक्शन सिनेमातसुद्धा. स्त्री नटांना दुय्यम भूमिका देण्यामागचा त्याचा विचार मला पटत नाही. फक्त मिशेल यो या नटीने पोलिस स्टोरी ३मध्ये त्याला अॅक्शन प्रसंगात पाच पावलं मागे टाकलं होतं त्यामुळे असेल कदाचित किंवा एका मुलाखतीत स्त्रियांनी स्वैपाकघर व मुलं सांभाळायला हवीत असं म्हणाल्यामुळे असेल पण त्याच्यातला पुरुष आजही पुरुषसत्ताक मानसिकता दाखवतो हे मला खटकतं. तसेच स्त्रियांशी निगडीत सवंग पातळीवर केलेले विनोद हे त्याच्या चित्रपटात बऱ्याचदा दिसून आलंय.

Wheels on Meals
त्याला उत्तम पद्धतीने आणि नियंत्रितपणे दाखवलं ते सॅमो हंगने ड्रॅगन्स फॉरेव्हर आणि व्हील्स ऑन मिल्समध्ये. ड्रॅगन्स हा माझ्या मते त्याचा जमलेला सिनेमा आहे. ज्यात चांगली कथा आहे. पात्रांना द्विमितीत लिहिलेलं आहे. कथानक कुठेही भरकटत नाही. सफाईदार अॅक्शन प्रसंग आहेत. यात हंगने जॅकीला हाताबाहेर न जाऊ देता त्याच्या पात्राला नायकत्व देऊन सुद्धा स्वतःला आणि युआन बियूला न्याय दिलाय. शेवट ओढूनताणून न आणता कथेद्वारे कळसाध्याय साधलाय. जॅकीने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात कथा ही दुय्यम असते आणि जॅकी स्वतःला संपूर्ण फोकसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसेच डोक्याला वात होईल अशी सलीम-जावेद छापाची डायलॉगबाजी करतो. त्यामानाने हंग बराच विचार करून कथानक निवडतो अन् जॅकीला पेश करतो. उदा. व्हील्स ऑन मिल्समध्ये शेवट प्रतीकात्मक दाखवलाय म्हणजे मोन्दाल या खलनायकाशी तिघे लढतात ते तलवारीच्या मारामारीत. हंग खलनायकाला हरलेला दाखवतो ते फक्त तिघांनी त्यांच्या तलवारी त्याच्यावर रोखलेल्या दाखवून. अश्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात रक्तपात न दाखवता परिणाम साधायचा हे जॅकीच्या आणि हंगच्या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. तरीही काही-काही सिनेमात त्यांनी दुष्ट लोकांना यमसदनात धाडलेलं दाखवलय पण हॉलीवूडप्रमाणे नाही.

जॅकीच्या चित्रपटात मारामारीच्या प्रसंगात कराटे प्रशिक्षीत नटांना घेतल्याचं दिसून येतं अपवाद मिशेल योमिशेल यो ही कदाचित एकमेव नटी असेल जिने त्याच्या काळात कराटेचे प्रशिक्षण न घेता मोठी अॅक्शन स्टार होण्याचं धाडस केलंय. बेनी उरकीद्झ या नटासोबतचे मारामारीचे प्रसंग हे नायक-खलनायक एकाच पातळीवर असतील तर पडद्यावर काय करू शकतात याचे उत्तम उदाहरणे आहेत. बेनी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा किक बॉक्सर होता. व्हील्स ऑन मिल्समध्ये त्याची आणि जॅकीची मारामारी बघण्यासारखी आहे. यु ट्यूबवर त्याची व्हिडीओ क्लिप बघायला मिळेल. त्या प्रसंगात पहिल्यांदाच जॅकीला कोणीतरी मागे टाकतंय असं दिसून येईल. या मारामारीची तुलना ब्रूस ली आणि चक नोरीस यांच्या वे ऑफ ड्रॅगनमधील शेवटच्या प्रसंगाशीच होऊ शकेल. इथे व तिथे दोन्ही प्रतिद्वंदी तुल्यबळ असल्यामुळे दिग्दर्शकाने कोणालाही झुकते माप न दिल्यामुळे प्रसंगातील गांभीर्य योग्य कोरियोग्राफ केलेल्या हालचालींमूळे बघणीय झालीय. अश्या प्रकारचे प्रसंग जॅकीच्या इतर सिनेमात नंतर दिसून आले नाहीत.

आज हा माझा चाइल्डहुड हिरो पडद्यावर म्हातारा दिसायला लागला आहे. गेली पन्नास वर्ष हा अभिनेता आपल्या अंगभूत कौशल्याद्वारे आपलं मनोरंजन करत आहे आणि आपण त्याच्या कारकिर्दीचे साक्षीदार होतो, आहोत हे माझं नशीबच समजतो.


हा लेख एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता पण  तो छापला गेला नाही.   

Comments