अलिगढ : हार्डीअन शोकांतिका
प्राध्यापक
श्रीनिवास सिरस “मी मज हरपून बसले गं...” हे गाणं समोर बसलेल्या श्रोत्यांसमोर
सादर करत असतात तेव्हा त्यांच्या मनात असणाऱ्या भावना चेहऱ्यावर लख्खपणे दिसून
येतात. अलिगढ चित्रपटातला हा प्रसंग काही क्षणांपुरताच येतो. त्यात प्राध्यापक
सिरस त्यांच्या मिश्कील स्वभावचं दर्शन घडवतात पण त्याची पार्श्वभूमी मात्र
प्रेक्षकांना हेलावून सोडते कारण ते मिश्कीलपणे गाणं म्हणत असले तरी ते ज्या
दिव्यातून जात असतात त्याचा साक्षीदार प्रेक्षक असतो. त्याला ते सहन होत नसतं. हे
असं एकाचवेळी गंभीर असणं व मिश्कील असणं चित्रपटात वेळोवेळी दिसून येतं.
८ फेब्रुवारी २०१०
च्या रात्री अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक श्रीनिवास सिरस (मनोज
वाजपई) नेहमीप्रमाणे त्यांच्या नेहमीच्या सायकलरिक्षावाल्यासोबत घरी यायला
निघालेत. रात्र खूप झाली आहे. तो रिक्षावाला त्यांना सोडायला वरच्या मजल्यावर जातो.
तो बराच वेळ बाहेर येत नाही. तेवढ्यात दोन इसम, पैकी एकाच्या हातात दंडुका असते व
दुसऱ्याच्या हातात हँडीकॅम असतो, त्यांच्या घरात घुसतात. बराच वेळ आवाज ऐकू येतात.
काही दिवसांनतर एक प्राध्यापक श्रीधरन त्यांच्याकडे येऊन त्यांनी केलेल्या
कृत्यासाठी एक चिठ्ठी लिहून घेतात. विद्यापीठाने ताबडतोब त्यांना विना चौकशी काढून
टाकलेले असते. तिकडे दिल्लीस्थित एका वर्तमानपत्रात काम करणारा दीपू सबॅस्टीयन
(राजकुमार राव) त्याची बॉस नमिताला (दिलनाझ इराणी) सांगतो की अलिगढ मुस्लीम
विद्यापीठाने एका प्राध्यापकाला ग्रॉस मिसकंडक्टसाठी काढून टाकलेलं आहे. नमिताला ही नेहमीची सेक्स
स्कँडलची केस वाटते. दीपूला निव्वळ सेक्स स्कँडलची केस न वाटता त्या पलीकडे बरंच
काही आहे असं वाटत असतं. तिला पटवून प्राध्यापक सिरसना भेटायला तो निघतो.
शोकांतिकेकडे नाटककार
विल्यम शेक्सपिअर व कादंबरीकार थॉमस हार्डी वेगळ्या पद्धतीने बघायचे. शेक्सपिअरचं
म्हणणं असायचं शोकांतिका ही मानवाच्या कृत्याशी निगडीत असते. त्याला सामाजिक परिणाम
नसतात. त्याच्या शोकांतिकेचे नायक हे त्यांच्या कृत्याचे बळी आहेत. तर हार्डी
म्हणायचा शोकांतिका ह्या सामाजिक परिणामाच्या परिपाक असतात. ‘टेस ऑफ डू’अव्हील्स’
ही कादंबरी त्याची विचारसरणी ठळकपणे नोंदवते. पटकथाकार अपूर्व असरानी व दिग्दर्शक
हंसल मेहता यांचा हार्डीच्या विचारसरणीवर विश्वास असावा. त्यांनी प्राध्यापक सिरस
यांच्यावर झालेल्या अन्यायाला याच दृष्टीकोनातून बघितले आहे. त्याचे परिणाम संपूर्ण
चित्रपटात दिसून येतात.
भारतीय कायद्यातील
एका कलमामुळे आपल्या लैंगिक स्वातंत्र्याची होणारी गळचेपी समाजातल्या एका विशिष्ट
लोकांना सहन करावे लागत आहे. त्या विषयी प्रचंड उहापोह चालू आहे. लैंगिक
स्वातंत्र्य, लैंगिक स्वैराचार, नैतिकता-अनैतिकता यांच्या व्याख्या यावर चॅनलीय
चर्चांपासून ते न्यायालयातल्या वादी-प्रतिवादींपर्यंत घमासान युद्ध बघायला मिळतं.
या सर्व गदारोळात जी व्यक्ती याच्या केंद्रस्थानी आहे तिच्या आयुष्यात काय घडत
असेल. तिची मानसिकता कशी असेल. तिला समाज समजावून घेतो की त्याला लाथाडतो. अशा
मानवीय बाबींचा विचार पटकथाकार-दिग्दर्शक करतात. ते सिरसवर झालेला अन्याय व
त्यांची कायदेशीर लढाई याला जितकं महत्व देतात त्यापेक्षा त्या व्यक्तीला जो एकाकीपणा
जाणवतो याकडे लक्ष वेधतात. दिग्दर्शकाला हा एकाकीपणा खटकतो. त्या व्यक्तीचं समाजाच्या
दुट्टपी वागण्यामुळे समाजापासून तुटणं याला इथे महत्व येतं. यामुळे भारतीय समाजाचं
अधःपतन झालंय का या प्रश्नापर्यंत दिग्दर्शक येऊन ठेपतो.
हंसल मेहतानी
चित्रीकरणात ठेवलेला पॅटर्न सिरसचं पर्यायाने भारतीय समाजाचं चित्र प्रभावीपणे मांडतं.
वाईड अँगल शॉट्सचा सढळ वापर कथा नेमकेपणे पोचवते. अशा पद्धतीने विचार केला
असल्याने अभिनेत्यांच्या अभिनयाला वाव तर मिळतोच वर प्रेक्षक कथेशी तादात्म्य पावतात.
पुढे काय घडेल यापेक्षा जे बघितलंय त्यावर विचार करायला त्यांना वेळ मिळतो.
चित्रपटाची गती ही पटकथेतून आलेली आहे. चित्रीकरणातून किंवा संकलनातून येत नाही.
तसेच त्या रात्री सिरससोबत काय झालं हे चटकन न दाखवता योग्यवेळी योग्यपणे उचित
प्रसंगी ते येतं. ते प्रेक्षकांसमोर असंख्य प्रश्न उभे करतं.
मनोज वाजपईची निवड
योग्य असली तरी तिला वयाचा अडसर काही काही प्रसंगात दिसतो. तिला बगल देऊन कायिक
अभिनयातून ते प्राध्यापक सिरसचा एकाकीपणा, अगतिकता, हतबलता उत्तमपणे दाखवतात. दीपू
भेटल्यानंतर त्यांच्यातील मिश्कीलता चेहऱ्यासोबत देहबोलीतून जाणवते किंवा ‘आपकी नजरो ने समझा, प्यार के काबील मुझे’
हे गाणं ऐकताना त्यांचा मुद्राभिनय बघण्यासारखा. राजकुमार राव, आशिष विद्यार्थी व
इतर मंडळी योग्य ती साथ करतात.
भारतीय समाजाला
लैंगिकता ही चर्चा किंवा माहितीची देवाणघेवाण करून त्यातील समज-गैरसमज दूर
करण्यासाठी नसून लपवून ठेवावी अशी गोष्ट आहे यावर विश्वास आहे. त्याच्याशी निगडीत
नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पना पण तशाच व्यक्तीसापेक्ष. त्यामुळे हार्डीअन
शोकांतिकेप्रमाणे आपल्या समाजाची अवस्था झाली आहे याकडे चित्रपट निर्देश करतो.
रेटिंग ४/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २८/०२/२०१६





Comments