फितूर : ये दिल मांगे मोअर
एखादी साहित्यकृती सिनेमासाठी रुपांतरीत करताना
त्यातल्या कथानकाला धक्का न लावता तिचे काळानुरूप रुपांतर करण्यात यावे हे
अपेक्षित असते. वर्तमान प्रेक्षकाला साहित्यकृतीच्या त्यावेळच्या काळाशी निगडीत
कथानक दाखवण्यात आले तर कदाचित ते भावेल का नाही हे सांगणं मुश्कील आहे. त्या ऐवजी
त्याला वर्तमानकाळाचा संदर्भ दिला तर तो तादात्म्य पावू शकतो. त्या बरोबरच
साहित्यकृतीचं कालातीत असणं सुद्धा तपासता येतं. चार्ल्स डिकिन्सची ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ अशीच एक
गाजलेली साहित्यकृती. पटकथाकार-दिग्दर्शक अभिषेक कपूर याने काश्मीरच्या
पार्श्वभूमीवर तिचं कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
नूर (मोहम्मद अब्रार/आदित्य रॉय कपूर)
काश्मीरमध्ये आपल्या मोठ्या बहिणीकडे राहत असतो. त्याला चित्रकलेची आवड असते. तसेच
बहिणीच्या नवऱ्याला त्याच्या कामात मदत करत असतो. कामानिमित्त तो एकदा अंजुमन या
हवेलीत जातो जिथे हजरत बेगम (आदिती राव हैदरी/तब्बू) तिची मुलगी फिरदौस (तुनिषा
शर्मा/कतरिना कैफ) हिच्यासोबत राहत असते. नूरला बघून बेगम त्याला आपल्या
तबेल्यातील घोड्यांना सांभाळायचं काम देते. नूर व फिरदौस यांच्यात मैत्री सोबत
अजूनही बऱ्याच गोष्टी घडत असतात ज्या बेगमच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाहीत. इकडे
काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया चालू होतात. ज्यात एका बॉम्ब हल्ल्यात नुरची
बहीण मारली जाते. बेगम परिस्थितीचा आढावा घेऊन फिरदौसला शिकायला लंडनला पाठवते.
नूर तिच्या आठवणीत चित्रकलेत स्वतःला हरवून घेतो. कर्मधर्मसंयोगाने दिल्लीत
त्याच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध होते. तो दिल्लीला जायचा निर्णय घेतो.
पटकथाकार-दिग्दर्शक अभिषेक कपूर व सुप्रतिक सेन
यांनी ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’चा प्रेमाचा केंद्रबिंदू तेवढाच फक्त उचललाय व त्याला काश्मीरच्या
पार्श्वभूमीची जोड दिली आहे. त्यामुळे कथानक प्रेमाला केंद्रस्थानी ठेवून इतर गोष्टींना
दुय्यम स्थान देतं. काश्मीरची साधारण पंधरा वर्षांपूर्वीची अवस्था व
भारत-पाकिस्तान संबंध हे सुद्धा कथेत येतात पण त्यांचं प्रयोजन चवीपुरतं राहत.
त्याला वास्तवाची जोड मिळत नाही. पटकथाकार-दिग्दर्शक यांचा दृष्टीकोन एक प्रेमकथा
सांगणे इतपतच राहिल्यामुळे वरील गोष्टी कशासाठी योजल्या हा प्रश्न उरतो.
वास्तवाचा आधार रूपांतराला कसा असावा हे दोन
वर्षांपूर्वी आलेल्या ‘हैदर’ सिनेमाने दाखवून दिले आहे. प्रेमाशी निगडीत कथानक
असणारे असंख्य सिनेमे यापूर्वी येऊन गेलेले आहेत. ते नेहमीच निर्वातात घडताना
दाखवलेले आहेत. त्यांना कधीच समकालीन वास्तवाची जोड द्यावीशी वाटली नव्हती. कथानक
त्यांच्यापुरतं प्रभावी असणंच त्यांच्या सर्वदूर प्रभावाला कारणीभूत ठरलं होतं.
फितूर काळाला गरजेपुरतं वापरून ढोबळ कथानक मांडतो.
अभिषेक कपूरच्या या आधीच्या ‘काय पो छे’ मध्ये
पण चेतन भगतच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’चं रुपांतर करताना गोध्रा सदृश
भागाला पार्श्वभूमीला ठेवून मैत्रीची कथा सांगण्यात आली होती. मुळात थ्री
मिस्टेक्स... मध्ये सुद्धा गोध्रा प्रकरण पार्श्वभूमीला येतं पण त्याला समकालीन
वास्तवाशी जोडून ठोस भाष्य करावं असं दिग्दर्शकाला वाटलं नाही. तोच दृष्टीकोन इथे
वापरल्यामुळे ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’सारखी जागतिक साहित्यकृती असून एक चांगल्या
दर्जाची हिंदी प्रेमकथा इतकच त्याचं रुपांतर झालं आहे.
आदित्य रॉय कपूर व तब्बूचा अभिनयच काय ते
सिनेमाला धरून ठेवतं. कतरिना कैफच्या अभिनयाला मर्यादा आहेत हे दिसून येतंच पण
जास्त अन्याय झालाय तो तिच्या व्यक्तिरेखेवर. फिरदौस, बेगम व नूर हा त्रिकोण आहे.
त्यातील प्रेमाच्या जाणीवेने जवळ जवळ वेडसर वाटावेत असे नूर व बेगम आहेत तर फिरदौस
ही करिअर, प्रेम, जबाबदारी यांच्या हिंदोळ्यावर आहे. तिची घुसमट, मानसिक घालमेल
दाखवण्यात दिग्दर्शक कमी पडतो त्यामुळे तिची व्यक्तिरेखा एकमितीत राहते. तिला
त्रिमिती आकार येत नाही. भूतकाळाला वर्तमानकाळाशी नातं न जोडू शकणारी हजरत बेगम
तब्बू अप्रतिमपणे सादर करते. तीच गोष्ट आदित्य रॉय कपूरची. त्याच्या व्यक्तिरेखेला
दिलेले संवाद यापेक्षा अधिक त्याचे डोळे बोलतात. एका प्रसंगात बेगमच्या वागण्याची
बाजू त्याला कळते तेव्हा प्रेम करून आपण काय मिळवलं व प्रेम म्हणजे नेमकं काय
यातील फरक तो क्षणार्धात दाखवतो. त्याला नेहमी दाढीचे खुंट वाढलेले दाखवून
दिग्दर्शकाने उगाचच तो गंभीर असल्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न खटकतो.
अमित त्रिवेदीने दिलेली गाणी श्रवणीय झालीयेत.
खासकरून ‘ये फितूर मेरा’, ‘पश्मिना,’ व ‘हमिनस्तू,’ ऐकण्यासारखे. उर्वरित गाणी
कथेला पूरक. अनय गोस्वामीचं छायांकन काश्मीरचं सौंदर्य नेमकं पकडतं. एकूणात असंख्य
शक्यता असणाऱ्या या सिनेमाबद्दल ये दिल मांगे मोअर असंच म्हणावं लागेल.
रेटिंग ३/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह १४/०२/२०१६




Comments