नीरजा : प्रेरणादायी

धैर्यशील माणसे ही कोणत्याही प्रसंगात डगमगून जात नाहीत. त्यांच्यातील धाडसाला अशा प्रसंगांनी नवीन झळाळी मिळते. त्यांनी दाखवलेलं असामान्य कर्तृत्व इतरांसाठी प्रेरणादायी ठरतं. त्या धाडसाला किंवा समयसूचकतेला वयाची, जातीची, धर्माची बंधने नसतात. त्यांनी वेळ प्रसंगी प्राण गमावून इतरांचे प्राण वाचवणे हे इतर कुठल्याही कामापेक्षा काकणभर सरसच ठरतं. अशी जीवावर उदार होऊन इतरांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्ती नेहमीच आदरास पात्र ठरतात. नीरजा भनोत ही तेवीस वर्षांची तरुणी ५ सप्टेंबर १९८६ मध्ये झालेल्या कराची विमान अपहरण प्रकरणात सहकारी व प्रवाश्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मरण पावली. नीरजा तिच्या असामान्य कर्तृत्वाची कहाणी सांगतो.

बॉम्बेत राहणारी नीरजा भनोत (सोनम कपूर) ही फ्लाईट पर्सर किंवा मुख्य अटेंडंट म्हणून अमेरिकन विमान कंपनी पॅन अॅमसाठी काम करते असते. तिची आई रमा भनोत (शबाना आझमी) - वडील हरीश भनोत (योगेंद्र टिकू) व भाऊ यांच्यासोबत तिचं आयुष्य सुखनैव चालू आहे. ५ सप्टेंबरच्या १९८६ च्या रात्री ती नेहमीप्रमाणे तिच्या कामावर रुजू होते. फ्लाईट ७३ ची ती मुख्य अटेंडंट आहे. सर्व सुरळीत पार पडून बॉम्बेहून न्यू यॉर्कला निघालेले हे विमान कराची, फ्रंकफर्ट करत न्यू यॉर्कला पोचणार असते. कराचीत पोचल्यावर काही प्रवासी घेत असतानाच काही सुरक्षारक्षक हातात बंदुका वगैरे घेऊन विमानात जबरदस्ती चढतात तेव्हा नीरजाला जाणीव होते की पुढे काय होणार. ती प्रसंगावधान राखून इंटरकॉमवरनं मुख्य पायलटला विमान हायजॅक झालंय असं सांगते.

दिग्दर्शक राम मधवानी व कथा-पटकथाकार सईन काद्र्स, संवाद लेखक संयुक्ता चावला शेख यांनी नीरजाच्या धैर्याला जास्तीत जास्त वास्तववादी पद्धतीने कसं दाखवता येईल याचा विचार संहितेच्या पातळीवरनच केल्याचं सुरुवातीपासून दिसून येतं. एकदा संहितेच्या पातळीवर याचा विचार झाल्यामुळे पुढे निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे यथायोग्य परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रेक्षक पहिल्या प्रसंगापासून कथेला धरून राहतात ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत. 

आपल्याला एका सर्वसामान्य तरुणीची कहाणी सांगायची आहे याची सुस्पष्ट कल्पना दिग्दर्शक-पटकथाकारांना असावी तसेच ही कहाणी तिचं चरित्रपट असलं तरी नेहमीच्या चरित्रपटांसारखी तिची हाताळणी करायची नाही किंवा त्यात उगाच आपल्याला आवडतील ते पैलू प्रकर्षाने न दाखवता सर्वच बाजूंचा विचार केलेला दिसून येतो. खासकरून नीरजाचा भूतकाळ नेमका व अतिशय योग्य वेळी घटनाप्रसंगात आणून तिच्या धैर्यशीलते मागील प्रेरणा तपासणं तर अप्रतिमच. तसेच नीरजा राजेश खन्नाची मोठी चाहती असते त्यामुळे त्यांच्या सिनेमातली वाक्य, गाणी कथानकात गुंफून मजा आणलीय. कदाचित प्रत्यक्ष त्यावेळी तिला कुठनं प्रेरणा मिळाली हे सांगता येत नाही पण निर्मात्यांनी तिच्या आयुष्याची घटनेला दिलेली जोड कथेचा एकसुरीपणा टाळते.

हिंदी व्यावसायिक सिनेमात चरित्रपट हे ढोबळ पद्धतीने त्या व्यक्तीकडे बघतात. संहितेतील दोष त्याला जितके कारणीभूत आहेत तितकेच त्या व्यक्तीला सर्वसाधारण व्यक्ती न मानता कुणीतरी असाधारणच असं मानून चाललात तेव्हा निर्माण होणारी कलाकृती अप्रभावी ठरते. राम मधवानी हे टाळतात. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते कथानकाला वास्तववादी सूर देतात जो तिला प्रभावी ठरवतो. भावूक किंवा मेलोड्रामाटिक होणारे प्रसंग ते संयतपणे हाताळतात. उदाहरणार्थ नीरजाने पत्र वाचून दाखवण्याचा प्रसंग किंवा एका हायजॅकरने राग व्यक्त करण्याचा क्षण. हे प्रसंग त्यांना व्यक्ती म्हणून उभं करतात. योग्य व समजूतदार दिग्दर्शन कसं असावं हेच दिग्दर्शक सूचित करतो. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘एअरलिफ्ट’ मध्ये अशा दिग्दर्शनाची कमतरता भासली होती.

सोनम कपूरची निवड किती चपखल आहे हे पहिल्या फ्रेमपासून जाणवत राहतं. लिखीत संहितेच्या पलीकडे जाऊन व्यक्तिरेखा उभी करणे सर्वच अभिनेत्यांना जमतच असं नाही. सोनम त्याला अपवाद ठरवते. ही तिच्या कारकिर्दीला मैलाचा दगड ठरवणारी भूमिका. दिग्दर्शक व अभिनेता एकाच पातळीवर असतील काय होऊ शकतं हे सोनमचा अभिनय दाखवतं. तीच बाब शबाना आझमींची. शबाना आझमींची आई ही आई ही व्यक्तिरेखा कशी असावी याचा वस्तुपाठ ठरावी. काही काही प्रसंगात ते हायजॅकर्स ओव्हरअॅक्टिंग करतात पण एकूण परिणामात ते नगण्यच. उर्वरित अनोळखी कलाकारांचा सुद्धा अभिनय वाखाणण्याजोगा.

नीरजा भनोतचं हे कर्तृत्व तिला मरणोत्तर अशोक चक्र देऊन गेलं. सिनेमा संपल्यावर कदाचित डोळ्याच्या कडा पाणावतील तर ते होऊ द्यावं कारण ही तिच्यासाठी भावपूर्ण आदरांजलीच ठरेल.

रेटिंग ४/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २१/०२/२०१६

Comments