तेरे बिन लादेन: डेड ऑर अलाइव्ह : फसलेला सीक्वेल
सीक्वेल्स बनवताना
त्यातील कथा पुढे जाणं अपेक्षित असतं. कथेचा धागा आधीच्या चित्रपटातील कथेशी
मिळताजुळता असावा. तरीही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचा सीक्वेल करायचा ठरला
तेव्हा राजकुमार हिरानीने त्यातील मुन्नाभाई व सर्किट ही दोनच पात्रे पुढील
कथेसाठी निवडली. त्यांना वेगळ्याच घटना, प्रसंगात आणून एक वेगळ्या प्रकारचा सीक्वेल
‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये दिला. तोच प्रकार अभिषेक चौबेंनी ‘ईश्कीया’ सोबत केला. ‘डेढ
ईश्कीया’ मध्ये खालूजान व बब्बन यांची कथा एका वेगळ्याच पार्श्वभूमीवर पेश केली.
हा एक प्रकारचा ट्रेंडच ठरावा कारण अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘तेरे बिन लादेन: डेड
ऑर अलाइव्ह’ वरील दिग्दर्शकांचा दृष्टीकोन वापरायचं ठरवतात.
कथा सुरु होते
जेव्हा शर्मा (मनीष पौल) या दिल्लीतल्या एका हलवायचा मुलगा मुंबईत ढेरेदाखल होतो
तेव्हा. त्याला बॉलीवूडमध्ये मोठा दिग्दर्शक व्हायचं असतं जसे की गुरुदत्त,
राजकुमार हिरानी, करण जोहर वगैरे. मुंबईत स्ट्रगल करत असताना त्याची पद्दी सिंगशी (प्रद्युम्न
सिंग) ओळख होते. पद्दी सिंग हुबेहूब ओसामा बिन लादेनसारखा दिसत असतो. शर्माला
त्याला घेऊन एक चित्रपट करायची आयडिया सुचते.
तो निर्मात्यांच्या गळी कथा उतरवून
अली जफर (अली जफर) या हिरोला घेऊन ‘तेरे बिन लादेन’ नावाचा चित्रपट बनवतो. चित्रपट
यशस्वी होतो. पण शर्माला कुणी विचारत नाही कारण सर्व श्रेय अली जफर घेऊन जातो.
शर्मा व पद्दी मुंबई सोडून जायचं ठरवतात. तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांच्या
धाडसीपणामुळे ओसामा बिन लादेन मारला गेलाय असं जगाला कळतं पण त्याचा पुरावा काय
असं विचारल्यावर ते तोंड लपवतात. या मुश्किलीतून डेव्हिड चढ्ढा (सिकंदर खेर)
त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतात येतो.
२०१० साली ‘तेरे बिन लादेन’ आला तेव्हा त्याला समकालीन वास्तवाचा आधार होता.
अमेरिकेच्या राजकीय धोरणांचा अपत्य असणारा ओसामा बिन लादेन हा अतिरेक्यांचा
म्होरक्या जगाला वेठीस धरून होता. दररोज त्याच्या संदर्भातल्या बातम्या त्याला
वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावर ठेवायच्या. अशा जागतिक व्यक्तिमत्व असणाऱ्या एका
व्यक्तीला चित्रपटातील मुख्य पात्र ठरवून त्यावर उपहासात्मक शैलीत मांडायचं धाडस
तेव्हा समीक्षक व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. चित्रपटाची समकालीनता ‘लोहा
गरम है, मार दो हथोडा’ हे ठाकूर बलदेव सिंगचं वाक्य योग्य ठरवावं इतपत उत्तम होता.
पुढे ओसामाचा निप्पात झाला. अतिरेक्यांचा प्रभाव असला तरी त्याचा जागतिक
प्रभाव मिटला होता. तेव्हा पटकथाकार-दिग्दर्शक अभिषेक शर्मा परत तोच विषय घेऊन
चित्रपट बनवतात तेव्हा ते कितपत प्रभावी ठरतं ते बघावं लागतं. पटकथाकार प्रद्युम्न
सिंगसोबत ते पद्दी सिंग या ओसामासारख्या दिसणाऱ्या पहिल्या चित्रपटाल्यातल्या पात्रासारख्या
पात्राला परत आणतात. इथे त्याची पहिल्या चित्रपटातली पार्श्वभूमी व नाव बदलून
त्याला एक स्ट्रगलर गायक दाखवतात. थोडक्यात फक्त संकल्पना उसनी घेतात. हा पद्दी
सिंग पहिल्यातला नुरा एक कोंबडे पाळणारा खेडूत असतो.
त्यात तो ओसामासारखा दिसतो हेच
त्याच्यासाठी संकट उभं करायला पुरेसं असतं. इथे त्याचं दिसणं एक तर पटत नाही आणि
अतिशय ओढून ताणून आणल्यासारखं होतं. त्यामुळे पहिल्यात अस्सल खेडूत वाटणारा पद्दी
सिंग उर्फ नुरा यात चिकटवल्यासारखा वाटतो. हे ओढूनताणून बसवणं इतर पात्रांसंदर्भात
सुद्धा येतं. तसेच कथेला उपकथानकाची जोड दिली जाते. अफगाणीस्थानात कुठेतरी एक अतिरेकी
खलीली (पियुष मिश्रा) पद्दीला बघून जगाला ओसामा जिवंत असल्याचं दाखवण्याचा घाट
घालतो. त्यासाठी पद्दीचं अपहरण करतो. पुढे डेव्हिड चढ्ढा आल्यावर
गोंधळ उडायला लागतो.
चित्रपटाला नेमकं कशा पद्धतीने हाताळायचं याचा दिग्दर्शकाचा गोंधळ उडालेला
दिसतो. तो कधी उपरोधिक शैली वापरतो तर कशी उपहासात्मक. काही काही प्रसंगात
उपहासात्मक शैली प्रभावी वाटते. उदाहरणार्थ खलीली घेत असलेल्या ओलंपिया-ए-दहशतमध्ये
अतिरेक्यांचा केलेला उपहास प्रेक्षकांना हसवायला कारणीभूत ठरतो तर इतर ठिकाणी हीच
शैली बाळबोध वाटायला लागते. शाब्दिक, प्रासंगिक विनोद हसवत नाहीत. संवाद कथेनुरूप
न वाटता जोडल्यासारखे वाटतात.
प्रद्युम्न सिंग व सिकंदर खेरचा अभिनयच काय ती चित्रपटाला वाचवणारी गोष्ट.
राहुल सिंग, सुगंधा गर्ग, पियुष मिश्रा व इतरांची साथ पण योग्य. दोन तासांपेक्षा
जास्त वेळ घेणारा चित्रपट सुरुवातीपासून फसत जातो ते शेवटपर्यंत. राजकुमार हिरानी
व अभिषेक चौबेंच्या शैलीची नक्कल करायचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतो. कदाचित
विषयाची समकालीनता अजूनही शाबूत आहे असा काहीसा (गैर) समज दिग्दर्शकाला असावा
त्यामुळे असेल पण हा प्रयत्न फसलेला आहे हे नक्की.
रेटिंग २/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २८/०२/२०१६






Comments