घायल वन्स अगेन : घायल वन्सच पुरे

एखाद्या कथानकात शेवटी नायकाचा विजय झाल्यावर काही प्रश्नांची उत्तरे तशीच राहतात उदाहरणार्थ नायकाने खलनायकाला मारल्यावर जेलमधनं सुटून आल्यावर तो पुढे काय करतो. नोकरी करतो की धंद्याला लागतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याच्यासाठी प्राथमिक निकड असते का. त्याने केलेलं कृत्य पुढे त्याचं नायकत्व अबाधित ठेवतं की त्याला सर्वसामान्य आयुष्य कंठायला लागतं. ही उत्तरं मिळत नाहीत कारण नंतरच्या अध्यायात काय झालं हे दिग्दर्शकाला सांगावं वाटत नाही किंवा कथेला परिपूर्णता आल्यामुळे तिला उगाच खेचण्यात अर्थ नाही असं कदाचित असू शकतं. १९९० साली आलेल्या ‘घायल’ सिनेमातला नायक अजय मेहरा जेव्हा खलनायक बलवंत रायला मारतो तेव्हा कथेची गरज त्याला पूर्णत्वाला नेते. त्याला जेल झाल्यावर त्याच्या कुटुंबाचं किंवा त्याचं पुढे काय झालं याला उत्तर राहत नाही. पण पटकथाकार-दिग्दर्शक सनी देओलला वाटतं अजय मेहराच्या आयुष्यात पुढे काय झालं ते सांगावं.

आता अजय मेहरा (सनी देओल) सत्यकाम नावाच्या निर्भीड न्यूज चॅनलचा चालक-मालक आहे. तसेच तो पोलिसांना त्यांच्या अधिकाराच्या बाहेर असणाऱ्या केसेस मध्ये मदत करून रॉबिनहूड अशी प्रतिमा जपण्यात मश्गुल आहे. अशाच एका प्रकरणात द डेली हेराल्डचा मालक राजगुरूला (हर्ष छाया) जेरबंद करतो. त्यामुळे त्याची कीर्ती पसरते. एका कॉलेजच्या सत्कार समारंभात तो आपलं जगण्याचं तत्वज्ञान सांगतो. त्याला आदर्श मानणारे पण डॉक्युमेंट्री फिल्म्स बनवणारी चार मुले वरुण (रिशाब अरोरा), रोहन (शिवम पाटील), अनुष्का (आंचल मुंजाल) व झोया (डायना खान) कर्नाळा पक्षी अभयारण्यात डॉक्युमेंट्री करत असताना त्यांच्याकडून फिल्ममध्ये पूर्वाश्रमीचा पोलीस पण आता आरटीआय कार्यकर्ता जोई डिसुझाचं (ओम पुरी) आणि धनाढ्य उद्योगपती राज बन्सल (नरेंद्र झा), त्याचा मुलगा कबीर बन्सल (अभिषेक कुमार) व काकासाहेब (मनोज जोशी) यांच्यातल्या चर्चेचं चित्रीकरण होतं. त्या दरम्यान अशी घटना घडते की मुलांना त्या फुटेजचं काय करावं कळत नाही. मुलं ते फुटेज रोहनचे कॉर्पोरेट लॉयर असणारे वडील कृपलानीकडे (सचिन खेडेकर) सुपूर्द करतात. कृपलानी जे पाऊल उचलतो ते त्यांच्या जीवावर बेतणार असं दिसायला लागतं.

कथानक बऱ्यापैकी आजच्या काळाला कवेत घेणारं असलं तरी सिनेमा म्हणून तो प्रभावी ठरत नाही. पटकथाकार-दिग्दर्शक सनी देओलला नेमकं काय सांगायचं आहे याची सुस्पष्ट कल्पना आहे पण ती मांडायची कशी याची कल्पना नसावी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना विचार करायला वेळ न देता एका नंतर एक घटना, प्रसंग येत असतात त्यामुळे कशावर लक्ष केंद्रित करावं याचा संभ्रम तयार होतो. घडणाऱ्या घटना व त्यावरील पात्रांची प्रतिक्रिया यांच्यात वेळ घेतला जात नाही. ती तडकाफडकी निर्णय घेऊन कृती करायला लागतात. त्यामुळे ती अशी बाळबोध व हास्यास्पद का वागतायत हा प्रश्न पडतो. याला दिग्दर्शकाचा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन कारणीभूत ठरतो.

जी गोष्ट पटकथेची तीच दिग्दर्शनाची. अतिशय प्राथमिक दर्जाचं दिग्दर्शन व त्याला पात्रांकडून अभिनय न करून घ्यायची वृत्ती यामुळे कचकड्याची असणारी पात्रे एकतर संवाद म्हणताना आरडओरडा करतात किंवा संयत बोलण्याच्या नादात नको इतके गंभीर होतात. कित्येक प्रसंगात दिग्दर्शक गांगरालय हे स्पष्ट दिसतं. साधे-साधे दोन पात्रातील संवाद सुद्धा धड नीट चित्रीत केले जात नाहीत. जेव्हा असंख्य पात्रं एकत्र येतात तेव्हा ते नुसता गोंधळ घालतायत असं दिसतं.

अॅक्शन सिक्वेन्सेस व प्रसंगांवर मिशन इम्पॉसिबल मालिका, बोर्न चित्रत्रयी, डाय हार्ड मालिका, ट्रू लाईज व इतर हॉलीवूड सिनेमांचा प्रभाव. त्यांना धारदार संकलनाची जोड नाही. त्यामुळे डॅन ब्रॅडलेसारखा वरील सिनेमांसाठी स्टंट को-ओर्डीनेटर असणारा कुशल तंत्रज्ञ असून पण अप्रभावी. अॅक्शन सिक्वेन्सेस चित्रीत करताना कथानकाला पूरक असण्यासोबत नियंत्रित व चटकन संपणारे असावेत. इथे पाठलाग असणारे दोन सिक्वेन्सेस आहेत जे कधी एकदा संपतात असे वाटते. संकलनात त्यांना कमी करणं गरजेचं होतं. सिनेमात हीच दोन सिक्वेन्सेसच काय ते खिळवून ठेवतात. दिग्दर्शकाला तंत्राचा वापर यथायोग्य करता येणं त्याचा प्रेक्षकांवरील प्रभाव वाढवतं. इथे ते होत नाही.

नरेंद्र झा, मनोज जोशी, तिस्का चोप्रा, ओम पुरी, अभिषेक कुमार, नीना कुलकर्णी व इतरांचा चांगला अभिनय हीच काय ती सिनेमा बघायला भाग पाडते. ती चार मुले सुद्धा काही प्रसंगात प्रभावी अभिनय करतात. ज्याच्या जीवावर सिनेमा आहे तो सनी देओल मात्र अभिनय कसा करू नये याचं पदोपदी दर्शन घडवतो. राजकुमार संतोषीच्या दिग्दर्शनात ‘दामिनी’ व ‘घायल’ मध्ये भलताच प्रभावी वाटणारा हा नट इतर वेळी मात्र अति सामान्य पातळीवर राहतो हे नेहमीच दिसून आलंय. माध्यमाची उत्तम जाण असणारा दिग्दर्शक सिनेमाला किती गरजेचा असतो हेच या सिनेमाने अधोरेखित केले आहे.

रेटिंग : १/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह ०७/०२/२०१६

Comments