लवशुदा : मळलेल्या वाटेमुळे निराशा
रोमँटिक कॉमेडी किंवा
रॉमकॉम या सिनेमा प्रकारची एका शब्दकोशातील व्याख्या अशी आहे, “एक असा विनोदी
सिनेमा, नाटक किंवा टेलिव्हिजन प्रोग्राम की ज्या प्रेमकथेचा शेवट सुखांत असतो.”
हा सिनेमाचा खूपच लोकप्रिय प्रकार. त्याचं मुख्य कारण म्हणजे हसू आणि आसू याचं
एकत्रित चित्रीकरण जे प्रेक्षकांना भावतं, चटकन आपलंसं करतं. जीवन हे हसू आणि आसू
याचं मिश्रण असतं अशा पद्धतीने सार्वत्रिक समजलं जातं त्याचं प्रतिबिंब म्हणजे
रॉमकॉम सिनेमा. या निमित्ताने चटकन आठवावीत
अशी नावे म्हणजे ‘चीनी कम’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘जब वी मेट’ किंवा हृषिदांचा
क्लासिक ‘गोलमाल’. गिरीश कुमार-नवनीत कौर ढिल्लन अभिनीत लवशुदा असाच एक रॉमकॉम
आहे.
गौरव (गिरीश कुमार)
त्याच्या खोलीत अस्ताव्यस्त झोपलाय. त्याच्या पलीकडून एक मुलगी, पूजा (नवनीत कौर
ढिल्लन) उठते. गौरव हतबुद्ध होतो ही कुठनं आली कारण त्याच दिवशी त्याची एंगेजमेंट
असते. तिचा रात्रीतून हरवलेला टॉप शोधत न बसता तिला त्याच्या होणाऱ्या सासूने खास
बनवलेला शर्ट घालायला देऊन पळवून लावतो. पण नंतर लक्षात आल्यावर तिला शोधणं आलंच.
त्याला तिचं नाव सुद्धा माहिती नसतं. आदल्या रात्री बॅचलर्स पार्टी करायला
गेलेल्या त्याच्या मित्रांसोबत तो तिला शोधायला निघतो. ती सापडते एकदाची. मग
दारूच्या नशेत त्याने काय केले हे तिच्याकडून कळतं तेव्हा त्याला आपण काय करून
बसलो याची जाणीव होते. एंगेजमेंट होते पण जिच्यासोबत आयुष्य घालवायचं त्यापेक्षा
जिच्यासोबत एका रात्री पुरतं जे झालं तीच आवडायला लागते अन् आपलं निर्णय चुकला असं
त्याला वाटायला लागतं.
वैभव मिसरांनी
दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा पटकथा त्यांचीच आहे. कथा रॉमकॉमला साजेसी. एक
मुलगा एका मुलीला भेटतो. त्यांच्यात मैत्री होते. मैत्रीचं प्रेमात रुपांतर होतं.
काही कारणाने विसंवाद होतो आणि तो सुसंवादात बदलून त्यांचं मिलन होतं. हा सिनेमा
सुद्धा तोच फॉर्म्युला वापरतो पण सादरीकरणाची पद्धत किंचित बदलून. इथे कथानक
उलगडतं ते पात्रांच्या बोलण्यातून त्यामुळे पुढे काय होणार हे माहिती असलं तरी
त्याची उत्सुकता टिकून राहते. फ्लॅशबॅकद्वारे भूतकाळ दाखवला जातो. असा दृष्टीकोन
पटकथाकार-दिग्दर्शकाने संपूर्ण सिनेमात बऱ्यापैकी ठेवला असल्यामुळे आधी परिणाम
दाखवला जातो मग त्या पाठीमागचं कारण सांगितलं जातं. मध्यंतरानंतर पूजाच्या
आयुष्यात काय चाललंय हे दाखवण्यासाठी त्रयस्थ भूमिकेत दिग्दर्शक जातो तेव्हा थोडी
निराशा होते पण तो दोष म्हणता येणार नाही.
अशा सिनेमात आई-वडील
किंवा तत्सम वडीलधारी मंडळी ही खलनायक होण्याची शक्यता जास्त असते कारण नायक नायिकेला
मुख्य खलनायक नसेल तर ही मंडळी त्रासदायक वाटतात. इथे अशी वडीलधारी मंडळी असली ती
वाईट किंवा खलनायकी पद्धतीने न वागता त्यांच्या नैसर्गिक सहजतेने वागतात. याचं
श्रेय दिग्दर्शकाला जातं. तरीही सिनेमा म्हणून तो परिचित फॉर्म्युल्यात नवखं काही देण्याचं
टाळतो. मळलेली वाटच जोपासतो. त्यामुळे सादरीकरणावर भर इतपतच याची मजल जाते.
तिस्का चोप्रा आणि
सचिन खेडेकरची अप्रतिम साथ सिनेमाला मुख्य अभिनेत्यांबरोबरच लक्षात ठेवायला
कारणीभूत ठरते. गिरीश कुमारचा ‘रमैय्यावस्तावैय्या’ नंतरचा हा दुसराच सिनेमा.
त्याला अभिनयाची समज आहे हे पहिल्याच सिनेमात दिसून आले होते. इथे एक पाऊल पुढे
जाणं अपेक्षित होतं पण दिग्दर्शकाला त्याला नेमकं कसा हाताळायचा याच्या गोंधळात त्याचा
अभिनय पहिल्या इतपतच राहिला आहे. नवोदित नवनीत कौर ढिल्लन जेमतेम अभिनय करते. तिला
अभिनयाचे पैलू दाखवावेत असं कथानकात काही नसल्यामुळे तीही खूप रंग भरू शकत नाही.
गौरवचा मित्र म्हणून नवीन कस्तुरिया उल्लेखनीय.
अशा सिनेमाची गाणी
हा नेहमीच त्यांचा प्लस पॉइंट असतो किंवा बऱ्याच रॉमकॉम्सना त्यातील गाण्यांनीच
वाचवलय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. संगीतकार परिचय व मिथुन यांनी मिळून दिलेली
गाणी ही पार्टी साँग्ज म्हणून
उत्तम झालीयत. खासकरून ‘पिने की तमन्ना,’ ‘चित्ता कुक्कड,’ ‘दोनो के दोनो,’ ‘टोटल
टल्ली,’ तर मस्तच. आतिफ अस्लमच्या आवाजातील सईद काद्री लिखीत ‘मर जाएं’ पार्श्वभूमीला
येतं तेव्हा ते कथानकाचा सूर नेमका पकडतं. पार्टी साँग्जच्या भाऊगर्दीत हे गाणं
मनात रेंगाळत राहतं.
सरतेशेवटी सादरीकरणाची वाट चोखाळणारा हा सिनेमा परिचित वाट सोडत नाही हेच काय
ते म्हणता येईल.
रेटिंग : २/५
पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह २१/०२/२०१६





Comments