सनम तेरी कसम : आणखी एक स्टिरिओटाइप

सुंदर दिसणे किंवा तत्सम गोष्टींचा अर्थ कसा लावायला हवा. एखादी व्यक्ती खासकरून तरुणी सुंदर आहे असं म्हटलं जातं तेव्हा ती नाकी-डोळी सुंदर दिसते की तिचा चेहरा सुंदर असतो. तिचा चेहरा देखणा आहे की तिच्या चेहऱ्याच्या ठेवणीला तिचा रंग जुळतोय की ती कशा पद्धतीचा पेहराव करते यावर तिचं सौंदर्य ठरवावं. निव्वळ बाहेरील सौंदर्याचाच मापदंड तिथे योग्य आहे की त्या व्यक्तीचे विचार, स्वभाव तिला इतरांपेक्षा वेगळं पाडून समोरील व्यक्तीच्या मनात तिच्याबद्दल एक प्रतिमा तयार करते जी त्याच्यापुरती सुंदर असते. ती आधुनिक अवतारात आहे की पारंपारिक यावर तिचं सौंदर्य जोखायला हवं. मग ही सुंदरता व्यक्तीसापेक्ष असते असं म्हणतात तेव्हा ते खरंच तसं असतं का! सरस्वती पार्थसारथी या सनम तेरी कसमच्या नायिकेबद्दल प्रेक्षकांना काही क्षणांकरीता निदान सिनेमातल्या वेळापुरतं तरी अशा पद्धतीने विचार करायला भाग पाडतं.

सरस्वती/सरू पार्थसारथी (मावरा हुसैन) ही एका पारंपारिक तामिळ भाषिक वैदिक ब्राह्मण कुटुंबातील लग्नाच्या वयाची मुलगी मुंबईतल्या एका सुखवस्तू सोसायटीत राहत असते. वडील जयराम पार्थसारथी (मनीष चौधरी) नोकरदार माणूस. भारतीय परंपरा जीवापाड जपणारा. दोन मुलींचा बाप. सरस्वतीसाठी आयआयटी-आयआयएमचाच पण परदेशस्थ वैदिक ब्राह्मण मुलगाच हवा असा आग्रह धरणारा. त्याच्या कडक शिस्तीत वाढलेली सरस्वती एकदम आंटी छापाची. तिला विभूती आंटी सुद्धा म्हटलं जातं. तिला यामुळे दहा मुलांनी नकार दिलेला असतो. त्यावरून घरात नेहमी वादविवाद होत असतात. तिची काळानुरूप बदलण्याची मानसिकता नसते. तरीही ती एका सुसज्ज ग्रंथालयात नोकरीला असते. इंदर परिहार (हर्षवर्धन राणे) हा तिच्याच सोसायटीत राहत असतो. त्याने आठ वर्ष जेलमध्ये काढलेली असतात. फ्लॅटमध्ये व्यायाम करणे व कुणा गर्लफ्रेंडसोबत दारू पीत पडून राहणे इतकाच त्याचा दिनक्रम असतो. ग्रंथालयात पुस्तके परत करण्याच्या बहाण्याने तो सरस्वतीकडे आकर्षित व्हायला लागतो अन् आपल्यात बदल घडायला लागलाय याची त्याला जाणीव होते.

राधिका राव व विनय सप्रू या पटकथाकार-दिग्दर्शक जोडीचा हा तिसरा सिनेमा. अकरा वर्षांपूर्वी आलेला ‘लक्की: नो टाईम फॉर लव्ह’ व मागच्या वर्षी आलेला ‘आय लव्ह एनवाय’ एवढेच काय ते त्यांचे आतापर्यंतचे दिग्दर्शक म्हणून काम. या सोबत असंख्य म्युझिक व्हीडीओज त्यांनी दिग्दर्शित केलेले. तरीही जेव्हा सिनेमा करायचा तर निदान आजच्या काळाला साजेसी कथा निवडायची असं बघून वाटतं. एका शब्दात सांगायचं तर हा सिनेमा क्लिशे आहे. संपूर्ण कथा-पटकथा ही क्लिशे आहे. यातील पात्र, संवाद, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, त्यावरील इतरांच्या प्रतिक्रिया वगैरे बाबी वापरून गुळगुळीत झालेल्या. 

पात्रं स्टिरीओटाईप्स. जसे गुजराती/सिंधी म्हटलं की व्यापारी/बिसनेसमन व पंजाबी म्हटलं की ढाबा चालवणारे तसेच मुख्य पात्र परंपरावादी म्हटलं की तामिळ वैदिक ब्राह्मण. या आधी रांजणा व रेहना है तेरे दिल मेंमधील मुख्य नायक हे सुद्धा तामिळ वैदिक ब्राह्मण होते. इतर राज्यातले ब्राह्मण कुटुंब परंपरावादी नसतात हे हिंदीवाल्यांना माहित नसावेत बहुतेक. पण एकदा स्टिरीओटाईप्स वापरायचे म्हटल्यावर पुढील बाबी सुकर होतात. तिच बाब नायकाबद्दल. त्याला जात-धर्म याची बंधनं नाहीत का तर तो श्रीमंत आहे. तसेच तो नायक असल्यामुळे सर्व परंपरा न मानणारा म्हणजे थोडक्यात पुरोगामी वगैरे विचारसरणीचा. असे असंख्य गैरसमज असणारे हे कथानक दिग्दर्शकद्वय पेश करतात.

अशा स्टिरीओटाईप्स पात्रांना घेऊन रचलेला हा सिनेमा तरतो तो मुख्य नायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या मावरा हुसैनचा उत्तम अभिनयामुळे व हिमेश रेशमियाच्या संगीतामुळे. मावरा हुसैनचा हा पहिलाच सिनेमा आहे असं वाटत नाही. 

आंटी छापाची साधीसुधी तरुणी ते मेक ओव्हर झाल्यावर एकदम मॉडर्न दिसणारी आत्मविश्वास परत आलेली तरुणी यातील फरक ती सहजतेने दाखवते. दोन्ही वेळी ती देखणी दिसते. महाविद्यालयीन तरुणींसाठी ती रोल मॉडेल ठरणार. हर्षवर्धन राणे हा सध्या शरीर कमावलेल्या अभिनेत्यांची जी ब्रिगेड आली आहे त्यात खपून जाणारा. अभिनय वगैरे बाबी अशा अभिनेत्यांसाठी दुय्यमच असतात तो याला अपवाद ठरत नाही. इतरांमध्ये परंपरावादी बाप म्हणून मनीष चौधरी लक्षात राहतात. हिमेश रेशमियाचं संगीत हे खास त्याच्या शैलीची आठवण करून देणारं. सध्या धुमाकूळ घालणारं तू खीच मेरी फोटो व इतर गाणी श्रवणीय.

व्यावसायिक हिंदी सिनेमांच्या अवकाशात जगाकडे बघायची एक विशिष्ट नजर असते त्याला हा सिनेमा अपवाद किंवा वेगळा ठरत नाही. एका अर्थाने त्यांच्या परंपरेला साजेसाच.

रेटिंग : २.५/५

पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाईव्ह ०७/०२/२०१६

Comments