प्यादा आणि हिंदी पल्प फिक्शन

लातुरातल्या मुख्य बस स्टँडमधल्या पेपर स्टॉलला भेट देणे हे लातुरात असतानाचे नित्यकर्मच असते. (आजही तो आहे.) शाळेत असताना त्या वेळी कार नसल्यामुळे म. रा. प. म. (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) च्या गाड्यातून दुसऱ्या गावी जाणे हाच पर्याय होता. उदगीर, गुलबर्गा, हुमनाबाद अशा गावांना जायला बस स्टँडलाच जायला लागायचं त्यामुळे तिथे गेलं की आधी त्या पेपर स्टॉलचं दर्शन घेणं ठरलेलं असायचं. त्याच्या समोरच्या एका बाजूला कॉमिक्स ठेवलेले असायचे. राज आणि डायमंड कॉमिक्सचे नायक नागराज, सुपर कमांडो ध्रुव, डोगा, भोकाल, बांकेलाल, चाचा चौधरी व इतरांचे कॉमिक्स ठेवलेले असायचे. त्यांना चाळून ते घेण्यासाठी वडिलांच्या मागे लागायचं. मला आठवतंय तेव्हा माझ्याकडे किमान शंभराच्यावर कॉमिक्स होते. ते नंतर कधीतरी आईनं मागे लागून रद्दीत घालायला लावले का तर त्यामुळे मी अभ्यास करायचो नाही. मग प्रवासात आणि ज्या ठिकाणी गेलं खासकरून उदगीरला गेल्यावर एका खोलीतल्या पलंगावर झोपून त्यात हरवून जायचं हे नेहमीचं.
तिथेच त्या स्टॉलवाल्याच्या पाठीमागे तिन्ही बाजूनी असणाऱ्या शो-केसमध्ये जाडजूड पुस्तकं ठेवलेली असायची. ती पुस्तकं आकर्षक होती. त्यांची नावं वेगळीच असायची. उदा. वतन की कसम, खुनी हवेली, किसका कत्ल करूं. त्या पुस्तकांचे मुखपृष्ठ एम्बॉस केलेली, काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर चंदेरी नाहीतर सोनेरी रंगाच्या रंगाने रंगवलेले त्यामुळे उठून दिसणारे, त्यावर रक्त, रिवॉल्वर, चाकू, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी, तिचे उन्नत उरोज चटकन मनावर ठसणारे अशा प्रकारचे असायचे. पुस्तकं नेहमीच्या पांढऱ्या कागदावर छापलेली नसायची. कागद बराचसा जाड त्यामुळे छापलेले शब्द कोरल्यासारखे वाटायचे. बांधणी करताना जो दोरा वापरला जायचा तो पहिल्या काही हाताळणीत लगेच उसवायला लागायचा मग मधली पानं गळून जायची. पुस्तकं देहली/दिल्ली, मेरठ आणि गोरखपूर इथं छापलेली म्हणजे मोठ्या शहरातनं असा समज झालेला. या कादंबऱ्यात माणसांची वर्णनं आहेत म्हणजे तिथे लोकं सुद्धा अशीच असतील ही भावना तयार झालेली.

ती पुस्तकं तिथे राजरोस मिळत असतील म्हणजेच कॉमिक्ससारखेच झकास असतील ही खात्री मनात होती. उदगीरला घरी मामा लोकं कुठनं तरी ही पुस्तकं आणायची आणि वाचायची. पण मला मात्र वाचायला द्यायचे नाहीत. मला विचित्र वाटायचं. घराजवळ तेव्हा एक वाचनालय होतं. अशा गावात वाचनालयात पेपर्स आणि ही पुस्तकं ठेवलेली असायची. तशी तिथे पण होती. तिथे एके दिवशी गेलो असताना असंच समोर टेबलावर ठेवलेलं पुस्तक घेऊन वाचायला लागलो. किती वेळ वाचलो माहित नाही पण त्यातील घटनाक्रमात थेट ओढण्याच्या शैलीने पुरतं गुंगवून टाकलं. किती पानं वाचली आठवत नाही पण निदान ५०-६० च्या आसपास सहज. बसल्या बैठकीला ५०-६० पानं वाचायची म्हणजे भलतीच स्पीड होती. त्यामुळे अजून हे वाचायला हवेत हे मनात पक्कं झालं. पण नंतर चान्स मिळाला नाही.

वेद प्रकाश शर्मा
पुढे येळवसच्या (दर्शवेळा अमावस्या – लातुरातील शेतकऱ्यांचा सण.) निमित्ताने आमच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या एका मित्राच्या आजोळी आलमल्याला जायचो. तिथे आदल्या दिवशी मुक्कामाला जायचं, दुसऱ्या दिवशी सण साजरा करायचा आणि तिसऱ्या दिवशी सकाळच्या बसने वापस यायचं असा क्रम असायचा. येळवस थंडीच्या दिवसात येणारा सण. त्यामुळे मुक्कामाच्या दिवशी उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना त्या मित्राने एके वर्षी एक जाडजूड पुस्तक दिलं वाचायला. ती एक तीन-चारशे पानांची कादंबरी होती. लेखक वेद प्रकाश शर्मा. मुंबईत देश मिटवण्याचा कट शिजतो आणि जीवाची बाजी लावणारे नायक-नायिका ते हाणून पाडतात. त्यात ती नायिका खलनायक लोकांच्या हाती लागते आणि ते तिची इज्जत लुटतात. अशा प्रकारचं कथानक होतं. त्यावेळी वाचन काय करायचं याला दिशा नव्हती, हातात जे पडेल ते श्रेष्ठच वाटायचं. हे जाडजूड पुस्तक अत्युच्च प्रतीचं साहित्य आहे ही भावना मनाने घेतलेली. लातूरला वापस आल्यावर ती पुस्तकं कुठे वाचायला मिळतील ते लक्षातच यायचं नाही. बस स्टँडवर असतात हे पण विसरून गेलो. दहावीनंतर खूप स्थित्यंतर घडले. वाचन गंभीर साहित्याच्या दिशेने व्हायला लागले. अशी पुस्तकं वाचण्याचा ट्रॅक निसटला. यांना पल्प फिक्शन म्हणतात असं आता आता काही वर्षांपूर्वी कळलं.

सुरेंद्र मोहन पाठक
यांना परत एकदा भेट द्यायला पाहिजे म्हणून मग पुण्याहून येताना रेल्वे स्टेशनवरनं जी भावतील ती विकत घ्यायला लागलो. चार-पाचच घेतली असतील. प्रातिनिधिक स्वरुपात असावीत म्हणून. त्यातच सुरेंद्र मोहन पाठकचं प्यादा ही सुधीर सिरीजमधली कादंबरी घेतली. वर उल्लेखलेल्या शर्मासोबत पाठक हे त्यांचे समकालीन आणि समवयस्क लेखक. मुंबईतील अंडरवर्ल्डला कंपनी ही उपाधी त्यांनीच नव्वदच्या दशकात एका कादंबरीत दिली. त्यांच्या पैंसठ लाख की डकैतीचे इंग्रजीत अनुवाद झालं आहे. ज़मीर का क़ैदीचं वाचन करून एकाने काही वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका बँकेत जसाच्या तसा दरोडा घातला होता. इतका प्रभाव असणारा हा लेखक तेव्हा वाचल्याचं आठवत नाही.

कादंबरी सुधीर कोहली (उच्चार कोल्ली) नावाच्या गुप्तहेराची आहे. तो एका टुकार सेल्समनच्या अचानक नाहीसे होण्याची केस सोडवत असतो. केस सोडवता सोडवता दिल्लीतल्या बिल्डर लॉबीचे दर्शन लेखक घडवतो. पाठकचं वैशिष्ट म्हणजे निवेदन करण्याच्या भानगडीत न पडता संवादातून नरेशन करणे (अशा प्रकारचा प्रयोग मराठीत श्री. ना. पेंडसेंनी ऑक्टोपस कादंबरीत केला आहे.), दिल्लीतली हरियाणवी, पंजाबी आणि स्थानिक भाषेचा उत्तम वापर करत रहस्य पेरत पेरत कळसाध्याय साधणे आहे. त्यांच्यावर अमेरिकेत १९३०-४० च्या दशकात छापल्या जाणाऱ्या पल्प फिक्शन कहाण्यांचा प्रभाव आहे तसेच आर्थर कॉनन डायल, अगाथा ख्रिस्ती, अर्ल स्टॅनले गार्डनर आणि जेम्स हॅडली चेसचा सुद्धा आहे असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. वाचताना ते जाणवतच तरीही भारतीय वाचकांना वाचायला उद्युक्त करायचं काम हे लेखक उत्तम प्रकारे करतात. 


आज याबद्दल लिहायचं कारण वर ज्या पेपर स्टॉलचा उल्लेख आहे तिथे काही दिवसांपासून त्या शो-केसमध्ये एकही तसलं पुस्तक दिसून येत नाही. त्यांच्या जागी व्यक्तिमत्व विकसन, यशस्वी कसे व्हावे, अभ्यासातील यश वगैरे नावांची पुस्तके आहेत. मी त्यांना कारण विचारलं ते म्हणले आजकाल पूर्वीसारखा वाचक राहिला नाही. तसेच पुस्तकं पांढऱ्या स्वच्छ कागदावर छापतात त्यामुळे त्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. कधीकाळी पन्नास रुपयांच्या आत असणाऱ्या किमती एकदम नव्वद ते दीडशेच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे विक्री होत नाही आणि नफा सुद्धा. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाने जसे इतर क्षेत्रात चंचुप्रवेश करून त्यांच्यात बदल घडवायला सुरुवात केली तसेच इथेही झाले. वाचकांना वाचनाची चटक लावण्याचं काम इमाने इतबारे करणरे हे लेखक आता फक्त इंटरनेटच्या माहिती जालात माहिती देण्यापुरते आणि तालुक्याच्या, छोट्या गावातल्या, खेडेगावातल्या वाचनालयातल्या कपाटात सापडतील. 

Comments

Anonymous said…
"पुस्तकं पांढऱ्या स्वच्छ कागदावर छापतात त्यामुळे त्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. कधीकाळी पन्नास रुपयांच्या आत असणाऱ्या किमती एकदम नव्वद ते दीडशेच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे विक्री होत नाही आणि नफा सुद्धा" :(
- SK
Anonymous said…
"पैंसठ लाख की डकैती", "ज़मीर का क़ैदी" आणि "किसका कत्ल करूं"(फक्त नावामुळे) वाचणार आहे नक्की !
- SK
Vivek Kulkarni said…
नक्की वाचा.
Unknown said…
छान आहे लेख.
Kshitij Desai said…
विवेक, सुरेख लेख.
Vivek Kulkarni said…
Thank you Kshitij Desai